मुहूर्त ठरला ! 30 मेला होणार मोदींचा शपथविधी

वृत्तसंस्था
रविवार, 26 मे 2019

या विजयात महत्त्वाचा वाटा असणाऱ्या नरेंद्र मोदी यांचा राजतिलक 30 मे रोजी होणार असल्याचे पक्के झाले आहे.

नवी दिल्ली : लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर केंद्रात नव्या सरकारच्या स्थापनेसाठी हालचालींना सुरवात झाली. भाजपने एकहाती विजय मिळवून काँग्रेसचे पानिपत केले. या विजयात महत्त्वाचा वाटा असणाऱ्या नरेंद्र मोदी यांचा शपथविधी 30 मेला होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

नरेंद्र मोदी हे दुसऱ्यांदा पंतप्रधानाची शपथ घेणार असून राष्ट्रपती भवनात सायंकाळी सात वाजता हा शपथविधीचा कार्यक्रम होणार आहे. या शपथविधी कार्यक्रमाची जय्यत तयारी सध्या राष्ट्रपती भवनात सुरू असून या सोहळ्यास तीन हजारहून अधिक पाहुण्यांना निमंत्रित करण्यात येणार आहे. 

शनिवारी (ता. 23 मे) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए)च्या संसदीय नेतेपदी निवड करण्यात आली. त्यानंतर त्यांनी राष्ट्रपतींना भेटून सरकार स्थापन करण्याचा दावा केला होता. 

भाजपने 2014 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत 282 जागा जिंकल्या होत्या, तर यंदाच्या निवडणुकीत 303 जागा जिंकल्या आहेत. 1971 मध्ये इंदिरा गांधींनी बहुमत मिळविले होते. त्यानंतर काँग्रेस पक्षाव्यतिरिक्त अशी कामगिरी करणारा भाजप हा दुसरा पक्ष ठरला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Narendra Modi to take oath as PM on May 30