
काही पक्षांकडून मतपेढीचेच राजकारण
नवी दिल्ली : काही राजकीय पक्षांनी अनेक दशके मतपेढीचेच राजकारण केले. त्यांच्या कल्याणकारी योजना फक्त काही लोकांसाठीच राबविल्या गेल्या पण भाजपने सातत्याने गरीब, दलित व देशाच्या महिलांच्या विकासासाठी काम करत राहण्याचा मार्ग निवडला, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेससह विरोधकांवर आज हल्लाबोल केला.
भाजपच्या ४२ व्या स्थापनादिनानिमित्त दिल्लीतील ६ दीनदयाळ मार्ग या राष्ट्रीय मुख्यालयात भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ही भव्य वास्तू फुलांनी सजविण्यात आली होती. मोदींनी अलीकडच्या गुजरात दौऱ्यात प्रस्थापित केलेली भगव्या रंगाची टोपी त्यांच्यासह सर्व नेत्यांनी परिधान केली होती. भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा, गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आदी वरिष्ठ नेते उपस्थित होते.
पक्षाध्यक्ष नड्डा यांनी ‘ केवळ एक राजकीय पक्षांपेक्षा सामाजिक कल्याणासाठी काम करणारी संघटना म्हणूनही भाजपची ओळख जनतेच्या मनात घट्ट झाली आहे.‘ असे सांगितले. ते म्हणाले, की कोरोनाच्या काळात गरीबांना दिलासा देण्यासाठी काम करणारा हा एकमेव पक्ष ठरला आहे. भारताने ४०० अब्ज अमेरिकी डॉलरच्या निर्यातीचे विक्रमी लक्ष्य साध्य केले आहे.
मोदी म्हणाले, की एक काळ असा होता की भारत प्रगती करू शकतो यावर विश्वास ठेवायचेच लोकांनी बंद केले होते. जनतेच्या खुंटलेल्या आकांक्षांना भाजपने साद घातली व सर्वांच्या साथीने व जाती धर्माने पहाता सर्वांच्या विकासासाठी प्रयत्न केले. देशाच्या चौफेर विकासात त्याचेच प्रतिबिंब पडल्याचे आज पहायला मिळते. काही राजकीय पक्षांना कायम बहुमताची काळजी लागलेली असे. भ्रष्टाचार व भेदभाव हे त्यांच्या मतपेढीच्या राजकारणाचे अनिष्ट परिणाम देशाने भोगले. पण भाजपने आपल्या स्पष्ट व शुद्ध उद्देशांनी अशा वृत्तींचा यशस्वीपणे मुकाबला केला. मोदी म्हणाले की यंदाचा भाजप वर्धापनदिन तीन कारणांनी खास आहे. शतकातून येणाऱ्या कोरोनासारख्या भीषण साथीचा सामना जगाने केला. भारताने या काळात समाजातील गरीब वर्गाच्या ८० कोटी लोकांना मोफत रेशन दिले. एकही भारतीय उपाशीपोटी झोपू नये या काळजीने केंद्र या योजनेवर सुमारे साडेतीन लाख कोटींचा खर्च करत आहे.
एक भारत श्रेष्ठ भारत
मोदी म्हणाले, की यंदा स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष असून देशवासीयांना प्रेरणा मिळण्यासाठी ही उत्तम संधी आहे. दुसरे म्हणजे जागतिक परिस्थिती अत्यंत वेगाने बदलत आहे. भारतासाठी सातत्याने नवनवीन संधी उपलब्ध होत आहेत. या काळात स्थानिक उत्पादने वैश्विक
पातळीवर नेण्याची व दुसरीकडे देशात सामाजिक न्याय सुनिश्चित करण्याची गरज आहे. 'एक भारत, श्रेष्ठ भारत'हा आपला आदर्श भाजप कार्यकर्त्यांनी सतत मजबूत करण्याची आवश्यकता आहे. रशिया-युक्रेन युद्धाचा संदर्भ देऊन मोदी म्हणाले, की या काळात भारताने आपली स्वतंत्र भूमिका मजबुतीने लावून धरली. सारे जग दोन गटांमध्ये सरळसरळ विभागले गेले असताना कोणत्याही जागतिक दबावाला न जुमानता भारताने आपल्या राष्ट्रीय हिताला प्राधान्य देऊन या काळात देशाची भूमिका निश्चित केली.
Web Title: Narendra Modis Attack On Opponents Free Rations Corona Period
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..