राष्ट्रीय हरित लवादाने तेल कंपन्यांना खडसावले

वृत्तसंस्था
शुक्रवार, 24 फेब्रुवारी 2017

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, हिंदुस्थान पेट्रोलियम आणि भारत पेट्रोलियम या कंपन्यांनी पेट्रोलियम पदार्थांची वाहतूक करणाऱ्या सर्व मालमोटारींच्या माहितीचा अहवाल सादर करण्यास शेवटची संधी देण्यात येत आहे. विशेषत: राजधानी दिल्लीत पेट्रोलियम पदार्थांची वाहतूक करणाऱ्या मालमोटारींची माहिती द्यावी

नवी दिल्ली : पेट्रोलियम पदार्थांची वाहतूक करणाऱ्या दहा वर्षांवरील डिझेल मालमोटारींबाबतचा अहवाल सादर न केल्याबद्दल सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांना राष्ट्रीय हरित लवादाने खडसावले.

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन आणि हिंदुस्थान पेट्रोलियम यांच्या पेट्रोलियम पदार्थांची वाहतूक करणाऱ्या मालमोटारी "बीएस-4' निकष पूर्ण करतात का? यावर प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश लवादाचे अध्यक्ष न्यायाधीश स्वतंत्र कुमार यांनी दिले. लवादाने गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात तेल कंपन्यांना नोटीस बजावत दहा वर्षांवरील डिझेल मालमोटारींचा वापर पेट्रोलियम पदार्थांची वाहतूक करण्यासाठी होतो का? याची माहिती देण्यास सांगितले होते.

लवादाने म्हटले आहे, की इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, हिंदुस्थान पेट्रोलियम आणि भारत पेट्रोलियम या कंपन्यांनी पेट्रोलियम पदार्थांची वाहतूक करणाऱ्या सर्व मालमोटारींच्या माहितीचा अहवाल सादर करण्यास शेवटची संधी देण्यात येत आहे. विशेषत: राजधानी दिल्लीत पेट्रोलियम पदार्थांची वाहतूक करणाऱ्या मालमोटारींची माहिती द्यावी. "बीएस-1', "बीएस-2', "बीएस -3' आणि "बीएस-4' हे निकष पूर्ण करणाऱ्या मालमोटारींची माहिती प्रतिज्ञापत्राद्वारे द्यावी. तसेच जुन्या मालमोटारी रद्द करण्याबाबत आखलेल्या योजनेबाबतही माहिती द्यावी. ठराविक मुदतीत प्रतिज्ञापत्र सादर न केल्यास तिन्ही कंपन्यांच्या व्यवस्थापकीय संचालकांना पुढील सुनावणीस हजर राहावे लागेल.

Web Title: national green tribunal slams oil companies