मेघालयही काँग्रेसच्या 'हाता'तून गेले

वृत्तसंस्था
सोमवार, 5 मार्च 2018

कॉनरॅड संगमा यांनी राज्यपालांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी त्यांच्याबरोबर यूडीपी, भाजप आणि एचएसडीपी या समर्थक पक्षांचे नेतेही उपस्थित होते. सध्याच्या विधानसभेची मुदत सात मार्चला संपत असल्याने आपल्या सरकारचा सहा तारखेला शपथविधी होण्याची शक्‍यता असल्याचेही संगमा म्हणाले.

शिलॉंग : नॅशनल पीपल्स पार्टीच्या (एनपीपी) नेतृत्वाखाली इतर प्रादेशिक पक्ष आणि भाजप या आघाडीकडे 34 आमदार असल्याचे सांगत "एनपीपी'चे अध्यक्ष कॉनरॅड संगमा यांनी आज राज्यपाल गंगाप्रसाद यांची भेट घेत सत्तास्थापनेचा दावा केला. निकालानंतर सर्वांत मोठा पक्ष ठरलेल्या कॉंग्रेसनेही सत्तास्थापनेचा दावा केला असला, तरी त्यांना बहुमतासाठी आवश्‍यक असलेल्या उमेदवारांचा पाठिंबा नसल्याचे स्पष्ट दिसत आहे. 

कॉनरॅड संगमा यांनी राज्यपालांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी त्यांच्याबरोबर यूडीपी, भाजप आणि एचएसडीपी या समर्थक पक्षांचे नेतेही उपस्थित होते. सध्याच्या विधानसभेची मुदत सात मार्चला संपत असल्याने आपल्या सरकारचा सहा तारखेला शपथविधी होण्याची शक्‍यता असल्याचेही संगमा म्हणाले. या निवडणूक निकालानंतर "किंगमेकर'च्या भूमिकेत असलेल्या "यूडीपी'ने आपले सहाही विजयी उमेदवार "एनपीपी'ला पाठिंबा देतील, असे जाहीर केले होते. लोकसभेचे दिवंगत माजी अध्यक्ष पी. ए. संगमा यांचे पुत्र असलेले कॉनरॅड संगमा हे सध्या लोकसभेत खासदार आहेत. 

दरम्यान, कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ, अहमद पटेल आणि सी. पी. जोशी यांनी काल (ता. 3) संध्याकाळी राज्यपालांची भेट घेत सत्तास्थापनेचा दावा केला होता. सर्वाधिक जागा कॉंग्रेसलाच मिळाल्या असल्याने नियमाप्रमाणे आम्हाला सत्ता स्थापन करण्याचे निमंत्रण द्यावे, अशी विनंती कॉंग्रेस नेत्यांनी राज्यपालांकडे केली. कॉंग्रेसला मेघालयात 59 पैकी 21 जागा मिळाल्या असून, बहुमतासाठी त्यांना आणखी दहा जागांची आवश्‍यकता आहे. मेघालयात गेल्या दहा वर्षांपासून कॉंग्रेसची सत्ता आहे. दुसरीकडे, कमी जागा मिळूनही बिगरकॉंग्रेसचे सरकार स्थापन करण्यासाठी मदत करण्याची तयारी भाजपने दर्शविली आणि "एनपीपी'ला पुढाकार घेण्यास सांगितले होते. युनायटेड डेमोक्रॅटिक पार्टीचे (यूडीपी) अध्यक्ष डोन्कुपार रॉय यांची आज भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री किरण रिजीजू यांनी भेट घेत त्यांचे मन वळविले. या भेटीनंतर बिगरकॉंग्रेस सरकारसाठी अनुकूल असल्याचे या पक्षाने जाहीर केले होते. मेघालयात कॉंग्रेस सत्तेपासून दूर राहिल्यास सर्वांधिक जागा मिळवूनही सत्तेचा घास तोंडापासून दूर राहिल्याच्या गोवा आणि मणिपूरमधील त्यांच्या इतिहासाची पुनरावृत्ती होईल. 

Web Title: national news BJP Alliance Invited To Form Meghalaya Government Congress Falters