मि. भागवत, तुम्हाला लाज वाटायला हवी: राहुल गांधी

वृत्तसंस्था
सोमवार, 12 फेब्रुवारी 2018

सरसंघचालकांनी केलेल्या वक्तव्यामुळे प्रत्येक भारतीय नागरिकाचा अपमान आझाला आहे. तसेच त्यांना देशासाठी मरण पत्करणाऱ्यांचा अनादर असल्याचेही दिसत आहे. भागवतांनी तिरंग्याचाही अपमान केला आहे. कारण, प्रत्येक लष्करी जवान तिरंग्याला सलाम करतो.

नवी दिल्ली - भारतीय लष्करापेक्षा कमी कालावधीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तीनच दिवसांमध्ये लष्कर उभे करू शकतो या सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या वक्तव्यावर जोरदार टीका करताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मिस्टर भागवत तुम्हाला लाज वाटायला पाहिजे असे म्हटले आहे.

देशासमोर आणीबाणीची स्थिती निर्माण झाल्यानंतर राज्यघटनेने परवानगी दिली तर आमचे स्वयंसेवक युद्धाच्या आघाडीवरदेखील जातील. रा. स्व. संघ ही काही लष्करी अथवा निमलष्करी संघटना नसून, ते एक पारिवारिक संघटन आहे. येथे प्रत्येक स्वयंसेवक लष्कराच्या शिस्तीमध्ये वावरत असतो. आमचे स्वयंसेवक हे नेहमीच देशासाठी आनंदाने सर्वस्वाचा त्याग करण्यासाठी तयार असतात, असे भागवत म्हणाले होते. याचमुद्द्यावरून देशभरातून टीका होत असताना राहुल गांधींनीही ट्विटरवरून भागवतांना लक्ष्य केले आहे.

राहुल गांधी म्हणाले, की सरसंघचालकांनी केलेल्या वक्तव्यामुळे प्रत्येक भारतीय नागरिकाचा अपमान आझाला आहे. तसेच त्यांना देशासाठी मरण पत्करणाऱ्यांचा अनादर असल्याचेही दिसत आहे. भागवतांनी तिरंग्याचाही अपमान केला आहे. कारण, प्रत्येक लष्करी जवान तिरंग्याला सलाम करतो. मिस्टर भागवत तुम्हाला लाज वाटायला हवी, की तुम्हाला हुतात्मा झालेल्या जवानांबद्दल आणि लष्कराबद्दल अजिबात आदर नाही.

Web Title: National news Rahul Gandhi statement on Mohan Bhagwat comment