फेसबुक डेटाचोरांशीही काँग्रेसचे हस्तांदोलन: रविशंकर प्रसाद

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 22 मार्च 2018

"केंब्रिज'ने बडतर्फ केलेला त्यांचा सीईओ अलेक्‍झांडर नॅक याच्याशी राहुल गांधींनी अनेकदा भेटीगाठी केल्या आहेत. त्यांच्या सोशल मीडिया प्रोफाइल्समागची "केंब्रिज'ची भूमिका काय आहे, हे कॉंग्रेसने सांगावे. 
- रविशंकर प्रसाद, केंद्रीय कायदामंत्री 

नवी दिल्ली : अमेरिकेपासून नायजेरियापर्यंतच्या अनेक देशांच्या निवडणुकांत अनेक भानगडींसह वैध-अवैध मार्गांनी हस्तक्षेप केल्याचे व लोकांच्या डेटा चोरीचेही आरोप असेलल्या "केंब्रिज ऍनालिटीका' या कंपनीशी राहुल गांधी यांच्या अध्यक्षतेखालील कॉंग्रेसने हातमिळवणी करून 2019 ची निवडणूक जिंकण्याचे उद्योग चालविले आहेत, असा गंभीर आरोप भाजपने आज केला. याच कंपनीवर तब्बल पाच कोटी भारतीयांचा फेसबुक डेटा चोरण्याचा आरोप असून, याबाबत सरकारने फेसबुकचे सर्वेसर्वा मार्क झुकेरबर्ग यांनाही सज्जड इशारा दिला आहे. 

"केंब्रिज ऍनालिटीका'विरुद्ध अनेक देशांत कारवाई सुरू आहे. नेमक्‍या याच कंपनीशी कॉंग्रेसने फेसबुकच्या माध्यमातून कोणते संबंध प्रस्थापित केले आहेत व सोशल मीडियात "फेक' लोकप्रियता मिळवायला कॉंग्रेस या मार्गाने जात आहे काय, असे प्रश्‍न कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी विचारले. तब्बल पाच कोटी भारतीय फेसबुक यूजर्सचा डेटा चोरीला गेल्याची माहिती फुटल्यावर व त्याच्याशी संबंध असल्याच्या बातम्या येऊनही कॉंग्रेसने पूर्ण मौन बाळगल्याने भाजपने आक्रमक शरसंधान केले आहे. सोशल मीडियावरील ही परकी घुसखोरी देशाच्या लोकशाहीसाठी घातक असल्याने व देशाच्या सुरक्षिततेचाही संबंध असल्याने भाजप व सरकारने हे प्रकरण गंभीरपणे घेतल्याचे प्रसाद म्हणाले. 

त्यांनी सांगितले, की कॉंग्रेसने 2019 च्या निवडणुकीच्या सोशल मीडियावरील प्रचारासाठी या कंपनीला जबाबदारी दिली आहे. तसेच याआधी गुजरात, त्रिपुरा व आता कर्नाटकाबाबतही कॉंग्रेसचा सोशल मीडियावरून प्रचार करण्याचे मुख्य काम "केंब्रिज'च करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाविरुद्ध कॉंग्रेस अध्यक्षांचे हे "ब्रह्मास्त्र' मानले जाते. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक जिंकण्यासाठी याच कंपनीची मदत घेतली होती; मात्र या कंपनीचे चारित्र्य व इतिहास भलताच खराब आहे. 

वादग्रस्त कंपनी 
"केंब्रिज'वर निवडणुकांत लाच घेणे, राजकीय नेत्यांना बायकांच्या भानगडीत अडकविणे व लोकांचा सोशल मीडिया डेटा चोरणे, अनेक देशांच्या निवडणुकांत अवैध मार्गांनी हस्तक्षेप करणे असे अनेक गंभीर आरोप आहेत. 

"केंब्रिज'ने बडतर्फ केलेला त्यांचा सीईओ अलेक्‍झांडर नॅक याच्याशी राहुल गांधींनी अनेकदा भेटीगाठी केल्या आहेत. त्यांच्या सोशल मीडिया प्रोफाइल्समागची "केंब्रिज'ची भूमिका काय आहे, हे कॉंग्रेसने सांगावे. 
- रविशंकर प्रसाद, केंद्रीय कायदामंत्री 

Web Title: National news Ravishankar Prasad criticize Congress on Facebook data leak