तोगडिया, उपाध्याय, रेड्डींवर कारवाई होणार 

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 21 जानेवारी 2018

तोगडिया यांनी गुजरातमध्ये आपल्यावर हल्ला झाल्याचा व मोदींकडून आपल्या जिवाला धोका असल्याचा गंभीर आरोप केला होता. मोदींवरील त्यांचा राग नवा नाही; मात्र या वेळेस त्यांनी आरोप करताना ताळतंत्र सोडल्याचे संघाचे मत बनल्याचे सूत्रांनी सांगितले. उपाध्याय यांनी दिल्लीत झालेल्या मजदूर संघाच्या देशव्यापी मेळाव्यात, कामगारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलेत, तर 2004 मधील "शायनिंग इंडिया'सारखी अवस्था करू, असा इशारा सरकारला दिला होता.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांचे सरकार यांच्यावर जाहीर टीकाटिप्पणी करणे विश्‍व हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगडिया व राघव रेड्डी व भारतीय मजदूर संघाचे ब्रजेश उपाध्याय यांना चांगलेच महागात पडण्याची चिन्हे आहेत. मोदींवर टीकास्त्र सोडल्याबद्दल भाजपची मातृसंस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या साऱ्यांवर चांगलीच गरम झाली आहे. परिणामी तिघांचेही त्यांच्या त्यांच्या संघटनेत पंख छाटण्याची कारवाई खास संघाच्या पद्धतीने सुरू झाल्याचे स्पष्ट संकेत आहेत. गुजरातमधील भांडण दिल्लीत आणल्याबद्दल संघ तोगडियांवर नाराज आहे. विहिंपची सर्व सूत्रे चंपत राय यांच्याकडे जाण्याचीही शक्‍यता आहे. 

तोगडिया यांनी गुजरातमध्ये आपल्यावर हल्ला झाल्याचा व मोदींकडून आपल्या जिवाला धोका असल्याचा गंभीर आरोप केला होता. मोदींवरील त्यांचा राग नवा नाही; मात्र या वेळेस त्यांनी आरोप करताना ताळतंत्र सोडल्याचे संघाचे मत बनल्याचे सूत्रांनी सांगितले. उपाध्याय यांनी दिल्लीत झालेल्या मजदूर संघाच्या देशव्यापी मेळाव्यात, कामगारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलेत, तर 2004 मधील "शायनिंग इंडिया'सारखी अवस्था करू, असा इशारा सरकारला दिला होता. या सर्व वक्तव्यांची संघाने गंभीर दखल घेतली आहे. सरसंघचालकांनी काही महिन्यांपूर्वीच जम्मूतील बैठकीत बोलताना, केंद्रातील सरकारला अवघडल्यासारखे होईल, अशी वक्तव्ये परिवारातील नेत्यांनी करू नयेत, असा इशारा दिला होता; मात्र त्यानंतरही तोगडिया व उपाध्याय यांनी बोलणे चालूच ठेवल्याने आता त्यांच्यावर कारवाईची वेळ आल्याचे संघसूत्रांनी मान्य केले.

संघात कोणावरही बेशिस्तीची कारवाई राजकीय पक्षाप्रमाणे होत नाही. त्यासाठीही संघाची वेगळी पद्धत असून, त्यानुसारच या दोघांनाही सक्रिय कामकाजातून बाजूला केले जाईल, असे सूत्रांचे म्हणणे आहे. तोगडिया हे सध्या विहिंपचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष असल्यामुळे तशीही त्यांच्यावर देशातील कामकाजाची जबाबदारी नाही. मोदींवर टीका केल्याने यापुढे त्यांना आहे त्या पदावरही पाणी सोडण्याची वेळ समीप आल्याचे मानले जाते. 

Web Title: National news RSS action against Pravin Togadia