त्रिपुरात माणिक 'सरकार' गेले; कमळ फुलले

वृत्तसंस्था
शनिवार, 3 मार्च 2018

भाजपने येथे 'इंडिजिनिअस पीपल्स फ्रंट ऑफ त्रिपुरा' (आयपीएफटी) सोबत आघाडी केली होती. या आघाडीचे 51 उमेवार रिंगणात उतरले होते. 'आयपीएफटी'ने नऊ जागांवर उमेदवार उभे केले आहेत.

आगरतळा : त्रिपुरात गेल्या 25 वर्षांपासून असलेले डाव्या पक्षांचे सरकार उलथवून लावण्यात भाजपला यश आले आहे. आज (शनिवार) झालेल्या विधानसभा निवडणुकीसाठी मतमोजणीत भाजपने आतापर्यंत 30 हून अधिक जागांवर आघाडी घेत सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा केला आहे. 

मागील 25 वर्षांपासून या राज्यात डाव्यांची सत्ता आहे. माणिक सरकार यांच्या नेतृत्वाखाली डाव्यांची याठिकाणी सत्ता होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्रिपुरामध्ये जोरदार प्रचार केला होता. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचेही याठिकाणी काम आहे. 

विधानसभेच्या एकूण 60 पैकी 59 जागांसाठी मतदान झाले असून, एकट्या चारिलाम मतदारसंघामध्ये 12 मार्च रोजी मतदान होणार आहे. माकपचे नेते रामेंद्र नारायणदेव बर्मा यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली होती. 59 जागांसाठी 307 उमेदवार रिंगणात आहेत. मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाने 57 जागांवर आपले उमेवार उभे केले होते, अन्य तीन जागा 'आरएसपी', 'फॉरवर्ड ब्लॉक' आणि 'भाकप'साठी सोडण्यात आली होती. हे सर्व डाव्या आघाडीचे घटकपक्ष आहेत. 

भाजपने येथे 'इंडिजिनिअस पीपल्स फ्रंट ऑफ त्रिपुरा' (आयपीएफटी) सोबत आघाडी केली होती. या आघाडीचे 51 उमेवार रिंगणात उतरले होते. 'आयपीएफटी'ने नऊ जागांवर उमेदवार उभे केले. त्रिपुराची झुंज एकाकी लढणाऱ्या कॉंग्रेस पक्षाने 59 जागांवर उमेदवार उभे केले होते. मात्र, त्यांना अद्याप एकही जागा मिळविण्यात यश आलेले नाही.

Web Title: National news Tripura assembly election BJP Left parties