
Punjab Congress: वाद मिटणार? सिद्धू आज दिल्लीत; पक्षश्रेष्ठींसोबत विशेष बैठक
नवी दिल्ली : पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योज सिंग सिद्धू आज गुरुवारी पक्षाचे जनरल सेक्रेटरी के सी वेणूगोपाल यांची दिल्लीत भेट घेणार आहेत. तसेच ते पंजाब काँग्रेसचे प्रभारी हरिश रावत यांची देखील भेट घेणार आहेत.
हेही वाचा: इंधन दरवाढीचा भडका! पेट्रोल-डिझेल पुन्हा महागलं
याआधी 28 सप्टेंबर रोजी नवज्योत सिंग सिद्धू यांनी पंजाबच्या कल्याणासोबत मी तडजोड करु शकत नाही, असं म्हणत थेट सोशल मीडियावरुन आपला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा जाहीर केला होता. त्यानंतर वरिष्ठ नेत्यांशी होणारी ही त्यांची पहिलीच भेट आहे. पंजाबमध्ये गेल्या दोन महिन्यामध्ये सातत्याने राजकीय उलथापालथ झाल्याचं पहायला मिळालं. सत्ताधारी काँग्रेसमध्ये सुरु असलेली अंतर्गत धूसफूस चव्हाट्यावर आलेली पहायला मिळाली. पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी पक्षश्रेष्ठींवर नाराजी व्यक्त करत पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर चरणजीत सिंग यांना मुख्यमंत्रीपदी आणलं गेलं. या सगळ्या मागे अप्रत्यक्षपणे असणारे सिद्धू यांनीच नंतर प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देऊ केला आहे. पंजाब काँग्रेसमधील ही अंतर्गत बंडाळी सुरु आहे ती येत्या काही महिन्यांवर येऊ ठेपलेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी... त्यामुळे या घटनांचे निर्णायक परिणाम काँग्रेसला भोगावे लागतील अशी चर्चा आहे.
हेही वाचा: छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालताना आमदाराची गंभीर चूक
रावत यांनी अलिकडेच केलेल्या ट्विटनुसार, सिद्धू हे संघटनात्मक विषयावर चर्चा करण्यासाठी आज दिल्लीला येत आहेत. के सी वेणूगोपाल यांच्या कार्यालयात आज सिद्धू आणि वेणूगोपाल यांची बैठक होणार आहे. याबाबतचं ट्विट रावत यांनी 12 ऑक्टोबर रोजी केलं होतं. ही बैठक काँग्रेस कार्यकारिणीच्या (CWC) बैठकीच्या दोन दिवस आधी होत आहे. कार्यकारिणीच्या बैठकीत पंजाबसह पाच राज्यांच्या आगामी विधानसभा निवडणुकांचे मुद्दे अजेंड्यावर असणार आहेत.
Web Title: Navjot Singh Sidhu In Delhi Today To Discuss Organisational Matters With Congress Leaders
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..