मंत्री झाल्यानंतरही नवज्योतसिंग सिद्धू यांनी टीव्ही करिअर हवेच! 

वृत्तसंस्था
मंगळवार, 21 मार्च 2017

गेल्या 12 वर्षांत मी पाच वेळा निवडणूक जिंकलो आहे. त्यावेळीही टीव्हीमध्ये काम करतच होतो. तरीही जनतेने हे स्वीकारले, मग तुम्हालाच काय अडचण आहे?

नवी दिल्ली: पंजाबच्या मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यानंतरही माजी क्रिकेटपटू आणि नेते नवज्योतसिंग सिद्धू यांना टीव्हीमधील करिअर सोडण्याची इच्छा नाही. यासंदर्भात आता कायदेशीर सल्ला घेतला जाणार आहे. यापूर्वी भाजपच्या तिकिटावर लोकसभेत निवडून गेलेल्या सिद्धू यांनी काही महिन्यांपूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. कॅप्टर अमरिंदरसिंग यांच्या नेतृत्वाखाली लढविलेल्या पंजाबमधील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला दणदणीत बहुमत मिळाले. यानंतर सिद्धू यांचा मंत्रिमंडळात समावेशही करण्यात आला. 

गेल्या काही वर्षांपासून सिद्धू टीव्हीतील विविध कार्यक्रमांमध्ये काम करत आहेत. सध्या कपिल शर्माच्या 'द कपिल शर्मा शो'मध्येही ते सहभागी आहेत. पंजाबमध्ये मंत्रिपदाची जबाबदारी आल्यानंतर त्यांना टीव्हीतील करिअरवर पाणी सोडावे लागेल, अशी चर्चा सुरू होती. मात्र 'माझ्या नव्या जबाबदाऱ्यांमुळे टीव्ही करिअरवर परिणाम होणार नाही,' असे सिद्धू यांनीच स्पष्ट केले. 

काँग्रेसला मिळालेल्या स्पष्ट बहुमतामुळे सिद्धू यांना पंजाबमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची आशा होती. मात्र त्यांच्याकडे स्थानिक प्रशासन, पर्यटन आणि सांस्कृतिक खाते सोपविण्यात आले. 'टीव्हीमधील करिअर कायम ठेवता यावे, यासाठी सिद्धू यांनीच कमी महत्त्वाच्या खात्याची मागणी केली,' अशा स्वरूपाचे वृत्तही काही माध्यमांनी दिले होते. 

'द कपिल शर्मा शो'च्या चित्रिकरणासाठी दर शनिवारी मुंबईत येऊन रविवारी पंजाबमध्ये जाणार असल्याचे सिद्धू यांनी गेल्या आठवड्यात सांगितले होते. 'गेल्या 12 वर्षांत मी पाच वेळा निवडणूक जिंकलो आहे. त्यावेळीही टीव्हीमध्ये काम करतच होतो. तरीही जनतेने हे स्वीकारले, मग तुम्हालाच काय अडचण आहे?' अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली होती. 

सिद्धू यांच्या या भूमिकेमुळे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी कायदेशीर सल्ला घेण्याचे ठरविले आहे. 'यासंदर्भात आम्हाला कायदेशीर सल्ला घ्यावा लागणार आहे. मंत्रिमंडळातील एखादा मंत्री अशा प्रकारे बाहेरचे कामही करू शकतो का, याविषयी सल्लागारांना विचारले जाईल. त्यामुळे कायद्यात ज्याप्रमाणे तरतूद असेल, तसेच करावे लागेल,' अशी प्रतिक्रिया अमरिंदरसिंग यांनी 'इंडिया टुडे टीव्ही'शी बोलताना दिली. 

दरम्यान, ज्येष्ठ विधिज्ञ आणि राज्यसभेचे खासदार के. टी. एस. तुलसी यांनी सिद्धू यांच्या भूमिकेवर टीका केली. 'टाईम्स नाऊ'शी बोलताना तुलसी म्हणाले, 'मंत्रिपद हे पूर्णवेळ काम असते. त्यामुळे मंत्री असताना दुसरे काहीही काम करण्याचा प्रश्‍नच उद्भवत नाही. किंबहुना, मंत्रिपदी शपथविधी झाल्यानंतर वकीलही त्यांचे काम थांबवितात. त्यामुळे, सिद्धू यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा किंवा टीव्हीवर काम करावे.'' 

Web Title: Navjyot Singh Sidhu wants to continue 'The Kapil Sharma Show' despite being a Minister