मुंबईवरील हल्ल्यामागे पाकिस्तानचे दहशतवादी - नवाज शरीफ

पीटीआय
रविवार, 13 मे 2018

पाकिस्तानात दहशतवादी संघटना सक्रिय असल्याची जाहीर कबुली देशाचे पदच्युत पंतप्रधान नवाज शरीफ यांनी प्रथमच दिली आहे. तसेच, अशा दहशतवाद्यांना सीमा ओलांडून मुंबईत लोकांची हत्या करण्यास परवानगी देणारे धोरण कितपत योग्य आहे, असा सवालही केला आहे. 
 

लाहोर - पाकिस्तानात दहशतवादी संघटना सक्रिय असल्याची जाहीर कबुली देशाचे पदच्युत पंतप्रधान नवाज शरीफ यांनी प्रथमच दिली आहे. तसेच, अशा दहशतवाद्यांना सीमा ओलांडून मुंबईत लोकांची हत्या करण्यास परवानगी देणारे धोरण कितपत योग्य आहे, असा सवालही केला आहे. 

याद्वारे मुंबईवर 2008 मध्ये झालेल्या हल्ल्यामागे पाकिस्तानच्या दहशतवाद्यांचा हात असल्याची कबुलीच आडवळणाने शरीफ यांनी दिली आहे. त्यामुळे पाकिस्तानला चांगली चपराक बसली आहे. पनामा पेपर्सप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने शरीफ यांना कोणतेही पद घेण्यास बंदी घातली आहे. "डॉन' या वृत्तपत्राशी बोलताना शरीफ म्हणाले, ""पाकिस्तानने जगात स्वतःलाच एकटे पाडले आहे. आपण अनेकदा त्याग करूनही आपले म्हणणे कोणी मान्य करत नाही. याचा विचार केला पाहिजे.'' 

मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफीज सईद आणि मौलाना मसूद अझहरच्या दहशतवादी संघटना जमात-उद-दावा आणि जैशे-महंमदचा थेट उल्लेख न करता शरीफ म्हणाले, ""देशात कोणत्याही निर्बंधाशिवाय दहशतवादी संघटना सक्रिय आहेत. त्यांना "नॉन स्टेट ऍक्‍टर्स' म्हणता येईल. अशा संघटनांना मुंबईत दीडशे लोक मारण्याची परवानगी आपण कशी काय देतो? मला हे समजावून सांगा. याबाबतच्या खटल्याची सुनावणी आपण का पूर्ण करीत नाही. दहशतवादी संघटनानांना मोकळीक देणे कदापी स्वीकारार्ह नाही. रशिया, चीनच्या अध्यक्षांनीही हे स्पष्टपणे सांगितले आहे.'' 

मुंबई हल्ल्याची सुनावणी सध्या रावळपिंडीच्या दहशतवादविरोधी न्यायालयात जवळजवळ ठप्प आहे. या प्रकरणी दहा वर्षे झाली, तरी पाकिस्तानने अद्याप कोणाला शिक्षा सुनावलेली नाही. यावरून हे प्रकरण प्राधान्याचे नसल्याचे पाकिस्तानने दाखवून दिले आहे. 
 

Web Title: Nawaz Sharif admits Pakistan played a role in Mumbai terror attack