नक्षलवादाचा धोका घटतोय - राजनाथसिंह

वृत्तसंस्था
सोमवार, 21 मे 2018

नक्षलवाद हे एक आव्हान आहे. मात्र, सध्या त्यापासून असलेला धोका कमी होत असून, त्याचे संघटन कमकुवत होत असल्याचे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी आज अंबिकापूर येथे केले. 

अंबिकापूर (छत्तीसगड) - नक्षलवाद हे एक आव्हान आहे. मात्र, सध्या त्यापासून असलेला धोका कमी होत असून, त्याचे संघटन कमकुवत होत असल्याचे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी आज येथे केले. 

"सीआरपीएफ'च्या बस्तरिया बटालियनच्या पासिंग आउट परेडनिमित्त आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. नक्षली कारवाया थोपविण्यासाठी सीआरपीएफ आणि छत्तीसगड पोलिस दलाकडून सुरू असलेल्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले. कारवायांदरम्यान पोलिस, जवान हुतात्मा तसेच, जखमी होण्याचे प्रमाण आता 55 टक्‍क्‍यांपर्यंत घटले असून, नक्षलवाद्यांच्या 40 ते 45 टक्के भाग त्यांच्या तावडीतून मुक्त करण्यात आला असल्याचे राजनाथसिंह यांनी या वेळी नमूद केले. 

जवानांच्या बलिदानाचे मोल पैशाने चुकते करता येत नाही. मात्र, एक कृतज्ञता म्हणून हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांना 1 कोटी किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम मदत म्हणून देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्याची माहिती राजनाथसिंह यांनी दिली. छत्तीसगडच्या विकासाला सरकारचे प्राधान्य असून, नक्षलवादासह इतर कोणत्याही प्रकारच्या अडथळ्यामुळे त्यात व्यत्यय येणार नाही, असेही राजनाथसिंह यांनी स्पष्ट केले. 

छत्तीसगडच्या बस्तर प्रांतावरून या बटालियनचे नाव "बस्तरिया' असे ठेवण्यात आले असून, त्यातील सदस्य हेही या प्रांतातील आहेत. बटालियनमध्ये 33 टक्के महिलांचा समावेश हे एक महत्त्वाचे वैशिष्ट असून, सुकमा, दंतेवाडा तसेच, बिजापूरसारख्या नक्षलग्रस्त भागातील कारवायांमध्ये ही 'बस्तरिया बटालियन' महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. 

Web Title: Naxal menace a challenge but now losing ground, says Rajnath Singh