सरकार अस्तित्वात येण्याची चिन्हे; आज काँग्रेस-राष्ट्रवादीची बैठक 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 नोव्हेंबर 2019

असे असेल संभाव्य वेळापत्रक 
- उद्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सरकार स्थापनेचा मसुदा शिवसेनेकडे सोपविणार 
- शिवसेनेकडून या मसुद्यावर गुरुवारपर्यंत उत्तर अपेक्षित 
- मंत्रिमंडळातील सदस्य संख्या, खातेवाटप, विधानसभा अध्यक्षपद कोणाकडे यावर रविवारपर्यंत निर्णय अपेक्षित 
- त्यानंतर पुढील आठवड्यात नव्या सरकारच्या शपथविधीची शक्‍यता 
- शिवाजी पार्कवर नव्या सरकारच्या शपथविधी सोहळ्यासाठी शिवसेना आग्रही 

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्तापेचावर तोडगा काढण्यासाठी आता दिल्लीतील हालचाली गतिमान झाल्या आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आज (ता. 20) महत्त्वाची बैठक होणार असून, त्यात सरकार स्थापनेच्या प्रस्तावित मसुद्यावर शिक्कामोर्तब होईल. हा मसुदा गुरुवारी शिवसेनेला सोपविला जाणार असून, पुढील आठवड्यात सरकार अस्तित्वात येण्याची चिन्हे दृष्टिपथात आहेत. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी काल शिवसेनेबाबत केलेल्या विधानांमुळे गोंधळ वाढला होता. आज मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चर्चेबाबत समन्वय होता. महाराष्ट्रातील सरकार स्थापनेवरून काँग्रेसच्या अहमद पटेल, महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, तसेच के. सी. वेणुगोपाल हे वरिष्ठ नेते दुपारी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींना भेटले. उद्या पवार यांच्या निवासस्थानी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची बोलणी होणार असल्याने त्यासंदर्भातील ही भेट होती असे काँग्रेसमधील सूत्रांनी सांगितले. त्यानंतर सायंकाळी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शरद पवारांशी भेट घेऊन चर्चा केली. 

सत्ता सहभागाबाबत कॉंग्रेसमध्ये मतप्रवाह ?

सूत्रांच्या माहितीनुसार, आज शरद पवार यांच्या निवासस्थानी होणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत राज्यातील प्रस्तावित सरकारच्या रचनेवर शिक्कामोर्तब होणार आहे. याबाबतचा मसुदा शिवसेनेकडे उद्याच सोपविला जाईल असेही समजते. प्रफुल्ल पटेल, अजित पवार यांच्यासोबतच काँग्रेस नेते अहमद पटेल, मल्लिकार्जुन खर्गे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण आणि अन्य नेतेदेखील बैठकीत सहभागी होतील. सरकार पाच वर्षे टिकावे आणि यानिमित्ताने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची शिवसेनेसोबत होणारी मैत्री स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही कायम राहावी, असा प्रयत्न दोन्हीही काँग्रेसचा असेल. त्यामुळे किमान समान कार्यक्रमावर सहमती तसेच वादग्रस्त मुद्द्यांवर एकत्रितपणे निर्णय करण्यासाठी सुकाणू समिती बनविणे यावरही उद्याच्या बैठकीत निर्णय अपेक्षित आहे. 

असे असेल संभाव्य वेळापत्रक 
- उद्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सरकार स्थापनेचा मसुदा शिवसेनेकडे सोपविणार 
- शिवसेनेकडून या मसुद्यावर गुरुवारपर्यंत उत्तर अपेक्षित 
- मंत्रिमंडळातील सदस्य संख्या, खातेवाटप, विधानसभा अध्यक्षपद कोणाकडे यावर रविवारपर्यंत निर्णय अपेक्षित 
- त्यानंतर पुढील आठवड्यात नव्या सरकारच्या शपथविधीची शक्‍यता 
- शिवाजी पार्कवर नव्या सरकारच्या शपथविधी सोहळ्यासाठी शिवसेना आग्रही 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP and Congress leaders meet in New Delhi for Maharashtra government formation