सत्ता सहभागाबाबत कॉंग्रेसमध्ये मतप्रवाह ?

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 नोव्हेंबर 2019

काँग्रेसचे तळ्यात-मळ्यात..! सत्तेत सहभागाबाबतचा निर्णय डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यातच; पक्षात दोन विचारधारा 

मुंबई  : महाराष्ट्रात शिवसेनेला पाठिंबा देण्यावरून काँग्रेसमध्ये विविध मतमतांतरे असून, पाठिंबा दिला तरी सत्तेत सहभागी व्हावे की न व्हावे, यावर जोरदार मतप्रवाह आहेत. भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवताना शिवसेनेसोबत जाताना राष्ट्रीय राजकारणावर विपरीत परिणाम होणार नाहीत, यासाठी मित्रपक्षांच्या नेत्यांसोबत काँग्रेस चर्चा करत असून, डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत निर्णय होईल, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, काँग्रेसने केवळ पाठिंबा देऊन चालणार नाही, तर सत्तेत सहभागी व्हायला हवे, असा राष्ट्रवादीचा आग्रह असल्याने निर्णय लांबणीवर पडल्याचा दावा करण्यात येत आहे.

राज्यात शिवसेना - राष्ट्रवादी - काँग्रेस अशी नवी आघाडी स्थापन करण्यासाठी शरद पवार यांच्या प्रयत्नांना काँग्रेसने सुरवातीला प्रतिसाद दिला. मात्र, सत्तास्थापनेबाबत वाटाघाटी करताना किमान समान कार्यक्रमावर अद्याप एकमत झालेले नाही. शिवसेनेसोबत सत्तेत जाताना पक्षाची विचारधारा, देशातील इतर मित्रपक्षांची भूमिका याबाबत काँग्रेस जपून पावले टाकत असल्याचे सांगण्यात येते. 

शिवसेना आमदारांना पाच दिवसाचे कपडे, आधार आणि पॅनकार्ड घेऊन येण्याचे आदेश
 

बिहारमध्ये लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दल, पश्‍चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी, उत्तर प्रदेशात अखिलेश यादव, कर्नाटकामध्ये जनता दल याशिवाय केरळातील काँग्रेस नेत्यांची याबाबतची भूमिका जाणून घेतली जात असल्याचे सूत्रांनी सांगितले. काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी शरद पवार यांना महाराष्ट्रातल्या सत्तास्थापनेत पुढाकार घेण्याचे अधिकार दिलेले असली तरी, काँग्रेसने सत्तेत सहभागी व्हायला हवे, यासाठी पवार आग्रही आहेत. 

राज्यात भारतीय जनता पक्षाला दूर ठेवण्यासाठी राज्यातील काँग्रेस नेत्यामधे एकमत असून, त्यांनी सोनिया गांधी यांच्याकडेही आग्रह धरला आहे. त्यातच काँग्रेसच्या 37 आमदारांनीही स्वतंत्रपणे शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करण्यासाठी सहमती दर्शविली असल्याने काँग्रेस पक्षश्रेष्ठींसमोर निर्णय घेताना संभ्रम निर्माण झाल्याचे सांगण्यात येते. 

पाच डिसेंबरला कर्नाटकमध्ये 15 जागांसाठी पोटनिवडणूक होत असून, या मतदानानंतरच काँग्रेसचा अंतिम निर्णय होण्याची दाट शक्‍यताही सूत्रांनी वर्तविली आहे. 

सोनियांनी विचारला जाब 

शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी मुंबईत एकत्रपणे बैठक घेऊन किमान समान कार्यक्रमाचा मसुदा तयार केला; पण काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी याबाबत राज्यातील काँग्रेस नेत्यांना जाब विचारल्याचे सांगितले जाते. अशाप्रकारे स्वत:हून किमान समान कार्यक्रमाचा मसुदा तयार करण्याची घाई कशासाठी केली, असा सवालदेखील पक्षश्रेष्ठींनी राज्यातल्या काँग्रेस नेत्यांना विचारल्याचे सांगण्यात येते.

WebTitle : maharashtra government formation conflict congress may have differences of opinion to support shivsena 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maharashtra government formation conflict congress may have differences of opinion to support shivsena