
घरगुती हिंसाचार महिलांनाच मान्य; सर्वेक्षणातून धक्कादायक माहिती समोर
घरगुती हिंसाचार चुकीचा आहे. घरगुती हिंसाचार करणं कायद्याने गुन्हा आहे. याबाबत अनेक माध्यमांमधून जनजागृतीही वारंवार केली जाते. मात्र तरीही नागरिकांच्या मानसिकतेमध्ये फारसा बदल झालेला आहे, असं दिसत नाही. घरगुती हिंसाचाराबद्दल धक्कादायक निष्कर्ष समोर आला आहे.
पत्नीने तिचं ठरवून दिलेलं काम केलं नाही, तिची कर्तव्यं बजावली नाहीत, तर तिचा शारिरीक छळ करण्यात काहीही गैर नाही, असं मत बहुतांश पुरुष आणि स्त्रियांनी व्यक्त केलंय. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून ही माहिती जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार, भारतातल्या जवळपास अर्ध्या लोकसंख्येला ही गोष्ट पटते, ज्यामध्ये केवळ पुरुषच नाही, तर स्त्रियांचाही समावेश आहे. कर्नाटकामध्ये यात ७६.९ टक्के महिलांचा समावेश असून पुरुषांचं प्रमाण ८१.९ टक्के आहे. तर देशभरात ४५ टक्के महिला आणि ४४ टक्के पुरुषांना घरगुती हिंसाचाराबद्दल कोणतीही समस्या नाही.
हेही वाचा: संतापजनक! सत्तरीच्या वृद्धाने केला १० वर्षांच्या चिमुरडीचा विनयभंग
या सर्वेक्षणातून जाहीर झालेल्या माहितीनुसार, सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांना पत्नीने पतीला न सांगता बाहेर जाणं, नीट स्वयंपाक न करणं किंवा पतीला तिच्यावर संशय येणं अशा कारणासाठी तिचा शारिरीक छळ करणं हे योग्य वाटतं. सरकारने सर्वोच्च न्यायालयाला दिल्या माहितीनुसार, शारिरीक संबंधांना पत्नीने नकार दिला तर तिला मारहाण करायला हवी, असं ११ टक्के महिलांना तर ९.७ टक्के पुरुषांना वाटतं.
सासरच्यांचा अनादर करणं हे घरगुती हिंसाचाराच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे, असं ३२ टक्के महिला आणि ३१ टक्के पुरुषांना वाटतं. त्याखालोखाल घराकडे आणि मुलांकडे दुर्लक्ष करणं हेही एक कारण आहे. नवऱ्यासोबत वाद घातल्यास बायकोला मारहाण केली पाहिजे असं २२ टक्के महिला आणि २० टक्के पुरुषांना वाटतं.
Web Title: Nearly Half Of Indian Men Women Think Domestic Violence Is Fine
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..