होय, आम्ही चुका केल्या. आत्मपरीक्षण करू : केजरीवाल

वृत्तसंस्था
शनिवार, 29 एप्रिल 2017

आम आदमी पक्षाला दिल्ली महानगरपालिकेमध्ये मोठ्या पराभावाला सामोरे जावे लागल्यानंतर पक्षातील अंतर्गत मतभेद समोर येऊ लागले होते. दरम्यान यावर दिल्लीचे मुख्यमंत्री आणि पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी "होय, आम्ही चुका केल्या. आत्मपरीक्षण करू' असे म्हणत स्पष्टीकरण दिले आहे.

नवी दिल्ली : आम आदमी पक्षाला दिल्ली महानगरपालिकेमध्ये मोठ्या पराभावाला सामोरे जावे लागल्यानंतर पक्षातील अंतर्गत मतभेद समोर येऊ लागले होते. दरम्यान यावर दिल्लीचे मुख्यमंत्री आणि पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी 'होय, आम्ही चुका केल्या. आत्मपरीक्षण करू' असे म्हणत स्पष्टीकरण दिले आहे.

केजरीवाल यांनी ट्विटद्वारे स्पष्टीकरण केले आहे. त्यांनी लिहिले आहे की, 'गेल्या दोन दिवसात मी पक्षाचे कार्यकर्ते आणि मतदारांना भेटलो. वास्तव उघड झाले आहे. होय, आम्ही चुका केल्या आहेत. मात्र आम्ही आत्मपरीक्षण करून त्या दुरूस्त करणार आहोत. आता माफीची नव्हे तर कृतीची वेळ आहे. कामाला लागण्याची वेळ आली आहे. बदल ही एकच गोष्ट स्थिर आहे.'

दिल्ली महानगरपालिकेतील पराभवानंतर 'आप'मधील अंतर्गत कलह समोर येत होते. पक्षाचे नेते कुमार विश्‍वास यांनी केजरीवाल यांच्या कार्यक्षमतेवर शंका उपस्थित केल्या आहेत. वारंवार होत असलेल्या पराभवाच्या पार्श्‍वभूमीवर पक्षाने आत्मशोध घेण्याचा सल्ला कुमार विश्‍वास यांनी दिला आहे.

देशभरात चर्चेचा विषय ठरलेल्या दिल्लीतील तीन महानगरपालिकांच्या निवडणुकांत भारतीय जनता पक्षाने सलग तिसऱ्यांदा ऐतिहासिक विजय मिळवताना 270 पैकी 185 जागा जिंकल्या. अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला 46 जागांवर समाधान मानावे लागले, तर तिसऱ्या क्रमांकावर फेकल्या गेलेल्या काँग्रेसची 77 वरून 28 जागांवर घसरगुंडी झाली.

Web Title: Need Action, Not Excuses, Says Arvind Kejriwal on MCD Defeat