नीरव मोदीची दिवाळखोरी 

पीटीआय
बुधवार, 28 फेब्रुवारी 2018

मुंबई/नवी दिल्ली - पंजाब नॅशनल बॅंकेतील (पीएनबी) गैरव्यवहारातील मुख्य आरोपी, अब्जाधीश हिरे व्यापारी नीरव मोदी याच्या आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या "फायरस्टार डायमंड' या कंपनीने दिवाळखोरीसाठी अमेरिकेतील न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. 

मुंबई/नवी दिल्ली - पंजाब नॅशनल बॅंकेतील (पीएनबी) गैरव्यवहारातील मुख्य आरोपी, अब्जाधीश हिरे व्यापारी नीरव मोदी याच्या आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या "फायरस्टार डायमंड' या कंपनीने दिवाळखोरीसाठी अमेरिकेतील न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. 

फायरस्टार डायमंडने न्यूयॉर्क येथील दिवाळीखोरी न्यायालयात अर्ज केला आहे. या प्रकरणाची सुनावणी न्यायाधीश शॉन एच. लेन यांच्यासमोर होणार आहे. कंपनीकडे दहा कोटी डॉलरची मालमत्ता आणि कर्ज असल्याचे कंपनीने अर्जात म्हटले आहे. मात्र, यात कंपनीचे संस्थापक नीरव मोदी आणि मेहुल चोक्‍सी यांचा उल्लेख नाही. फायरस्टार डायमंडने संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार, कंपनी अमेरिका, युरोप, आखाती देश आणि भारतात कार्यरत आहे. 

अजामीनपात्र वॉरंटसाठी हालचाली 
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नीरव मोदी विरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट काढण्यासाठी सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) पावले उचलली आहेत. मुंबईतील विशेष न्यायालयात नीरव मोदी याच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट काढण्यासाठी "ईडी'ने आज अर्ज केला. मोदी हा अमेरिकेत असल्याचे समजते. मोदी याला चौकशीसाठी हजर राहण्यासाठी तीन वेळा समन्स बजावूनही तो हजर राहिला नाही, असे "ईडी'ने न्यायालयात सांगितले. 

अलाहाबाद बॅंकेच्या प्रमुखांची चौकशी 
केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) आज "पीएनबी'तील गैरव्यवहारप्रकरणी अलाहाबाद बॅंकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक उषा अनंतसुब्रह्मण्यम यांची आज चौकशी केली. अनंतसुब्रह्मण्यम या "पीएनबी'मध्ये व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी पदावर 14 ऑगस्ट 2015 पासून कार्यरत होत्या. त्यांची 6 मे 2017 रोजी अलाहाबाद बॅंकेच्या प्रमुखपदी निवड झाली. त्यांच्या कार्यकाळात नीरव मोदी आणि मेहुल चोक्‍सी यांचे हजारो कोटींचे व्यवहार बॅंकेतील यंत्रणेच्या नजरेत न येण्याची कारणे "सीबीआय'ने त्यांच्याकडून जाणून घेतली. अनंतसुब्रह्मण्यम या "इंडियन बॅंक असोसिएशन'च्याही प्रमुख आहेत. तसेच "पीएनबी'च्या आंतरराष्ट्रीय विभागातील नेहल अहाद आणि मुंबई विभागाचे विमलेश कुमार या अधिकाऱ्यांची चौकशीही "सीबीआय'ने केली. 

करचुकवेगिरीप्रकरणी समन्स 
मुंबईतील स्थानिक न्यायालयाने करचुकवेगिरीच्या प्रकरणात नीरव मोदी याला समन्स बजावले आहे. प्राप्तिकर बुडविल्याप्रकरणी मोदी आणि त्याच्या कंपन्यांविरुद्ध हे समन्स बजाविण्यात आले आहे. 

"आयसीआयसीआय'ही चौकशीच्या फेऱ्यात 
मेहुल चोक्‍सी याच्या गीतांजली जेम्स कंपनीला आयआयसीआय बॅंकेसह 34 बॅंकांनी एकूण 5 हजार 280 कोटी रुपयांचे कर्ज दिले आहे. यामध्ये आयसीआयसीआय बॅंकेचे 773 कोटी रुपयांचे कर्ज आहे. यामुळे "सीबीआय'ने आयसीआयसीआय बॅंकेचे कार्यकारी संचालक एन. एस. कानन यांचीही चौकशी केली. 

Web Title: Neerav Modi PNB new delhi mumbai