नेस वाडिया यांना जपानमध्ये शिक्षा

वृत्तसंस्था
बुधवार, 1 मे 2019

अमलीपदार्थ बाळगल्याप्रकरणी प्रसिद्ध उद्योगपती नेस वाडिया यांना जपानमध्ये दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आल्याचे उघड झाले आहे. वाडिया यांच्याकडे 25 ग्रॅम अमलीपदार्थ आढळून आले होते.

टोकियो : अमलीपदार्थ बाळगल्याप्रकरणी प्रसिद्ध उद्योगपती नेस वाडिया यांना जपानमध्ये दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आल्याचे उघड झाले आहे. वाडिया यांच्याकडे 25 ग्रॅम अमलीपदार्थ आढळून आले होते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्च महिन्यात जपानमधील न्यू चितोस विमानतळावर वाडिया यांच्याकडे 25 ग्रॅम कॅनाबिस रेसिन नावाचा अमलीपदार्थ आढळून आला होता. त्यांना अटक करताना वाडिया यांनीही अमलीपदार्थ बाळगल्याचे आणि ते वैयक्तिक वापरासाठी असल्याचे कबूल केले होते. वाडिया यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यापूर्वी त्यांना काही दिवस ताबा केंद्रातही ठेवण्यात आले होते.

दरम्यान, वाडिया यांना सुनावलेली शिक्षा पाच वर्षांसाठी स्थगित झाली असून ते भारतात परत आले असल्याचे वाडिया ग्रुपने सांगितले. या शिक्षेचा वाडिया ग्रुपच्या कामकाजावर परिणाम होणार नसल्याचेही सांगण्यात आले. मात्र, वाडिया यांना आज शिक्षा सुनावल्याचे उघड होताच वाडिया ग्रुपचे समभाग 17 टक्‍क्‍यांनी कोसळले. 

नेस वाडिया हे उद्योगपती नस्ली वाडिया यांचे पुत्र आणि वाडिया ग्रुपचे वारसदार आहेत. अभिनेत्री प्रीती झिंटाबरोबरील मैत्रीमुळे 2005 मध्ये नेस वाडिया प्रसिद्धीस आले होते. नेस वाडिया यांनी अत्याचार केल्याचा आरोप नंतर प्रीती झिंटाने केले होते. हे दोघेही "आयपीएल'मधील किंग्ज इलेव्हन पंजाब या क्रिकेट संघाचे मालक आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ness Wadia has Prison in Japan