मराठी समजते, पण बोलता येत नाही

मराठी समजते, पण बोलता येत नाही

बेळगाव - नूतन महापालिका आयुक्‍त आणि नगरसेवकांत गुरुवारी (ता. २१) भाषेवरुन चांगलीच चर्चा रंगली. ‘मला मराठी समजते, पण बोलता येत नाही’ असे नूतन आयुक्त इब्राहीम मैगूर यांनी नगरसेवकांना सांगितले. पण, सभागृहाचा कार्यकाळ दोन आठवड्यात संपणार असल्यामुळे कन्नड-मराठीचा मुद्दा हवा कशाला, असे म्हणत नगरसेवक आयुक्त कक्षातून बाहेर निघून गेले.

गुरुवारी सत्ताधारी व विरोधी गटाच्या नगरसेवकांनी आयुक्‍तांची भेट घेतली. आयुक्तांना ओळख करून देताना ‘कन्नड’मध्ये बोला, असे नगरसेवक रमेश सोनटक्की गंमतीने म्हणाले. मराठी किंवा हिंदीत बोलला तर आयुक्तांना कळणार नसल्याचा चिमटाही त्यांनी काढला. त्यावर माजी महापौर किरण सायनाक यांनी आयुक्‍तांना, आपले मूळ गाव कोणते, असा सवाल केला. त्यावर ‘मी जमखंडी गावचा आहे’, असे आयुक्तांनी सांगितले. ‘जमखंडी येथे मराठी बोलतात. त्यामुळे आपल्याला मराठी येते का’, असा सवाल मराठी नगरसेवकांनी केला.

दरम्यान, आयुक्त व नगरसेवकांमध्ये अनेक विषयांवर चर्चा झाली. हुबळी-धारवाडमधील प्रभागांची संख्या वाढली असताना बेळगावची कशी वाढली नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना केला. प्रभाग पुनर्रचनेच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल झाल्याचे त्यांना नगरसेवकांनी सांगितले.

त्यावर पुनर्रचनेच्या मसुद्यावर आक्षेप मागविले होते का, असा सवालही त्यांनी केला. त्यावर मात्र अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर दिले दिले नाही. महापालिकेची आर्थिक स्थिती, महसूल वसुलीचे घटलेले प्रमाण, घरपट्टी वसुली वाढविण्याच्या काळात वॉर्ड क्‍लर्कना प्रशिक्षणासाठी पाठविणे आदी विषयांवर यावेळी चर्चा झाली. महसूल विभागाला नियमित अधिकारी नसल्यामुळे महापालिकेचे उत्पन्न घटल्याचे सोनटक्की यांनी सांगितले. त्यामुळे महसूल उपायुक्तपदी नियमित अधिकारी नियुक्त करण्याची मागणी त्यांनी केली. 

नगरसेवकांकडून स्वागत
महापालिकेचे कामकाज सुरळीत चालविण्यासाठी नगरसेवकांनी सहकार्य करावे, अशी अपेक्षा आयुक्तांनी व्यक्त केली. पण, आता दोन आठवड्यांतच नगरसेवकांचा कार्यकाळ संपणार असल्याचे आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले. शहरातील प्रभागांची संख्या, अर्थसंकल्प पूर्वतयारी आदी माहिती या वेळी आयुक्तांनी लेखा विभागाच्या अधिकाऱ्यांकडून घेतली. नगरसेवक, पालिकेतील विभागप्रमुख तसेच काही संघटनानी या वेळी आयुक्तांची भेट घेऊन त्यांचे स्वागत केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com