'ट्रॅक्टर रॅलीत हिंसाचाराला अमित शहाच जबाबदार; गृहमंत्र्यांना बडतर्फ करा'

सकाळ न्यूज नेटवर्क
Thursday, 28 January 2021

लाल किल्ल्यामध्ये झालेल्या दुर्दैवी घटनेमध्ये नाव येत असलेल्या दीप सिद्धूची‘मोदी-शहा यांचा चेला’अशी संभावना करताना हा संपूर्ण प्रकार शेतकरी आंदोलन कारस्थानाने दडपण्याचा प्रकार असल्याचाही आरोप केला आहे

नवी दिल्ली - प्रजासत्ताकदिनी शेतकरी संघटनांच्या ट्रॅक्टर मोर्चाच्या नावाखाली उपद्रवी घटकांनी केलेल्या हिंसाचारासाठी केंद्र सरकारचे गृहमंत्री अमित शहा जबाबदार असल्याचा आक्रमक हल्ला काँग्रेसने चढविला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तत्काळ अमित शहा यांना बडतर्फ करावे, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. लाल किल्ल्यामध्ये झालेल्या दुर्दैवी घटनेमध्ये नाव येत असलेल्या दीप सिद्धूची ‘मोदी-शहा यांचा चेला’ अशी संभावना करताना हा संपूर्ण प्रकार शेतकरी आंदोलन कारस्थानाने दडपण्याचा प्रकार असल्याचाही आरोप केला आहे. 

Viral Video: 'तुम्ही मला सोबत का नेलं नाही?' एकट्याने कोरोना लस...

काँग्रेसचे सरचिटणीस आणि मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी दिल्लीतील हिंसाचारावर केंद्र सरकारला आणि प्रामुख्याने गृहमंत्री अमित शहा यांना लक्ष्य केले. 

‘आक्रमक झुंड लाल किल्ल्यामध्ये शिरत असताना दिल्ली पोलिस हातावर हात ठेवून बसले होते. या घटनाक्रमात मोदी-शहा यांचा चेला दीप सिद्धूची हजेरी आश्चर्य आहे. सरकार बळाचा वापर करून शेतकरी आंदोलन दडपू शकले नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना हटविण्यासाठी आता कारस्थान केले जात आहे,’ असा आरोप सुरजेवाला यांनी केला. दिल्लीतील हिंसाचार आणि धुडगूस रोखण्याची जबाबदारी शेतकऱ्यांची नव्हे तर सरकारची आहे, असा इशारा देताना देशाच्या स्वातंत्र्याचे प्रतीक असलेला तसेच सर्वोच्च सुरक्षा असलेल्या लाल किल्ल्यामध्ये ४० ते ५० ट्रॅक्टर आणि धुडगूस घालणारे उपद्रवी मंडळी कसे शिरू शकतात, दीप सिद्धू या सर्वांचे नेतृत्व करत होता. सिद्धू आणि त्याच्या समर्थकांना लाल किल्ल्यापर्यंत जाण्याची परवानगी कोणी दिली, पोलिस खुर्च्यांवर बसून तमाशा पाहत होते, अशी प्रश्नांची फैर सुरजेवाला यांनी झाडली. 

हे वाचा - फेब्रुवारीमध्ये होणार 5 मोठे बदल; वाचा सर्वसामान्यांवर काय होईल परिणाम?

दिल्लीतील हिंसाचार शेतकरी आंदोलनाला वेगळे वळण देण्याचा प्रकार असल्याचे सूरजेवाला यांनी सूचक शब्दात सांगितले. ते म्हणाले की कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकरी संघटनांच्या आंदोलनामध्ये आतापर्यंत 178 शेतकऱ्यांनी प्राण गमावले आहेत. या शेतकऱ्यांना हिंसाचारच करायचा असता तर मागील 63 दिवसांपासून ते लाखोंच्या संख्येने हाडे गोठविणाऱ्या थंडीमध्ये दिल्लीच्या सीमेवर रस्त्यात कशाला बसले असते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: New delhi Amit Shah responsible for the violence in the tractor rally congress