चीन सीमेवरील स्थितीबाबत मोदींनी विरोधकांशी बोलावे: आनंद शर्मा

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 1 जुलै 2017

नवी दिल्ली: चीनशी लागून असलेल्या सीमेवरील परिस्थिती तसेच पाकिस्तानी सीमेवरील गंभीर स्थिती पाहता उपाययोजनांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षांशी तातडीने चर्चा करावी, असा सल्ला कॉंग्रेसने दिला. तसेच मोदींचा अमेरिका दौरा निष्फळ ठरला असून, यात भारतीय हितांना तिलांजली देण्यात आल्याचाही हल्लाबोल केला.

नवी दिल्ली: चीनशी लागून असलेल्या सीमेवरील परिस्थिती तसेच पाकिस्तानी सीमेवरील गंभीर स्थिती पाहता उपाययोजनांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षांशी तातडीने चर्चा करावी, असा सल्ला कॉंग्रेसने दिला. तसेच मोदींचा अमेरिका दौरा निष्फळ ठरला असून, यात भारतीय हितांना तिलांजली देण्यात आल्याचाही हल्लाबोल केला.

कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते आनंद शर्मा यांनी पत्रकारांशी बोलताना चीन आणि पाकिस्तानला लागून असलेल्या सीमेवर सध्या जे काही सुरू आहे, ते पाहता हा केवळ सरकारशी नव्हे तर राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित मुद्दा आहे. त्यामुळे सरकारने घेतलेला आढावा आणि या परिस्थितीचा मुकाबला कसा करावा याविषयी विरोधी पक्षनेत्यांना विश्‍वासात घ्यावे, असे आवाहन केले. तसेच, चीनशी 2005 मध्ये पंतप्रधानांच्या पातळीवर करार झाला आहे, त्यात वादग्रस्त परिस्थिती उद्‌भवल्यास या करारांतर्गतच शांततेच्या मार्गाने प्रश्‍नांची सोडविण्यावर दोन्ही देशांनी सहमती दर्शविली आहे. या करारांतर्गतच आताही प्रश्‍न सोडविला जावा, असे मत व्यक्त केले. मात्र, मोदींच्या अमेरिका दौऱ्यावर शर्मा यांनी टीका केली.

मोदींचा अमेरिकेचा दौरा म्हणजे केवळ त्या देशाला खूश करण्यासाठी होता. त्यात भारतीय माहिती तंत्रज्ञान क्षेत्र आणि आरोग्य क्षेत्राच्या हिताला तिलांजली देण्यात आली. अमेरिकेच्या अध्यक्षांकडून "एच 1 बी' व्हिसावर ठोस आश्‍वासन न मिळवता मोदी रिकाम्या हाताने परत आले. तसेच देशाच्या आरोग्य क्षेत्राचे नुकसान होईल, अशी आश्‍वासने देऊन आले. बहुराष्ट्रीय कंपन्यांकडून बनविली जाणारी स्ट्रोक, मधुमेह, कर्करोग, हृदयरोगावरील जीवनरक्षक औषधे, आपल्या दर नियंत्रण यादीतून बाहेर ठेवण्याचा प्रस्ताव भारतासमोर आहे. यामुळे शंभरहून अधिक औषधे महागडी होऊ शकतात. हे कोणत्याही परिस्थितीत मान्य केले जाणार नाही. हा दबाव पंतप्रधानांनी झुगारून द्यावा, असे आवाहन शर्मा यांनी केले.

Web Title: new delhi news aanand sharma china and narendra modi