'एअर इंडिया'त आता केवळी शाकाहारी भोजन

वृत्तसंस्था
मंगळवार, 11 जुलै 2017

कंपनी व्यवस्थापन म्हणते...
- प्रवाशांमध्ये आहाराविषयी जागरूकता
- अन्नाची नासाडी थांबविणे
- खर्चात कपात करणे
- प्रवासात वेळेचा अभाव

नवी दिल्ली: तुम्ही एअर इंडियाच्या विमानाने "इकॉनॉमी' वर्गातून देशांतर्गत प्रवास करीत असाल तर तुम्हाला केवळ शाकाहारी भोजनावर समाधान मानावे लागेल. देशातील सरकारी विमान कंपनी असलेल्या एअर इंडियाने देशांतर्गत प्रवास करणाऱ्या "इकॉनॉमी' वर्गातील प्रवाशांसाठी केवळ शाकाहारी भोजन देण्याचा निर्णय घेतला आहे. "बिझिनेस' वर्गातील प्रवाशांना मात्र भोजनात शाकाहारी व मांसाहारी असा पर्याय पूर्वीप्रमाणेच देण्यात येईल. अन्नाची नासाडी, खर्च कमी करण्यासाठी व भोजन व्यवस्था सुधारण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे कंपनीतर्फे सांगण्यात आले.

विमान प्रवासाच्या कमी अंतरावरील प्रवासात प्रवाशांना शाकाहारी भोजन देण्याचा निर्णय "एअर इंडिया'ने घेतला होता. आताचा हा नवा निर्णय म्हणजे त्याची पुढील पायरी आहे. "90 मिनिटांपेक्षा कमी वेळेच्या प्रवासात शाकाहारी भोजन देण्याचा निर्णय कंपनीने डिसेंबर 2015 मध्ये घेतला होता. विमानातील कर्मचाऱ्यांवरील ताण कमी करण्याचे कारण यासाठी दिले होते.' 45 मिनिटांपेक्षा कमी वेळ प्रवासासाठी प्रवाशांना पदार्थ देण्यास वेळ कमी असतो, म्हणून नाष्ट्याचे तयार डबे देतो. एक तासापेक्षा जास्त काळ विमान प्रवासातही उड्डाण आणि धावपट्टीवर विमान उतरण्याचा वेळ सोडून कर्मचाऱ्यांना केवळ 30 मिनिटे वेळ मिळतो. त्यामुळे प्रवाशांना आवड विचारण्यासाठी वेळच नसतो,'' असे सांगून "एअर इंडिया'च्या वरिष्ठ अधिकाऱ्याने कंपनीच्या निर्णयाचे समर्थन केले.

"प्रवाशांचे शाकाहाराला प्राधान्य'
बहुतेक विमान प्रवासी शाकाहाराला प्राधान्य देतात, असा अजब दावा "एअर इंडिया'च्या अधिकाऱ्यांनी या वेळी केला. ""याबाबत आम्ही पाहणी केली असून लोकांमध्ये आता आरोग्याविषयी जागरूकता निर्माण झाली असून, अनेक प्रवासी मांसाहारापेक्षा शाकाहार पसंत करीत असल्याचे दिसून आले आहे. यामुळे मांसाहारी पदार्थ मोठ्या प्रमाणात वाया जातात,'' असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. कंपनीने अधिकृत आकडेवारी दिली नसली तरी प्रवाशांना मांसाहारी भोजन सेवा देण्यासाठी दर वर्षी आठ कोटी रुपये खर्च होतात, असा दावाही अधिकाऱ्यांनी केला. तसेच 52 हजार कोटीच्या थकबाकीमुळे "एअर इंडिया'ची विक्री करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे खर्चात कपात करण्यावर कंपनीच्या व्यवस्थापनाचा सध्या भर आहे.

Web Title: new delhi news air india flight only veg foods