राज्यसभा सदस्यत्वाची शहा, इराणींनी घेतली शपथ

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 26 ऑगस्ट 2017

नवी दिल्ली: राज्यसभा निवडणूक जिंकून संसदेत प्रवेश करणारे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी यांनी आज खासदारकीची शपथ घेतली, तर केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री स्मृती इराणी यांनीही शपथ घेतली. गुजरातमध्ये राज्यसभेच्या तीन जागांवर नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये अमित शहा, स्मृती इराणी तसेच कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींचे राजकीय सचिव अहमद पटेल विजयी झाले होते.

उपराष्ट्रपती आणि राज्यसभा सभापती वेंकय्या नायडू यांच्या दालनात अमित शहा तसेच स्मृती इराणी यांनी शपथ घेतली. या वेळी अर्थमंत्री अरुण जेटली, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, संसदीय कामकाजमंत्री अनंत कुमार, अन्न व नागरी पुरवठामंत्री रामविलास पासवान, कायदामंत्री रवीशंकर प्रसाद, भाजप नेते भूपेंद्र यादव आदी हजर होते. अमित शहा यांनी हिंदीतून तर स्मृती इराणी यांनी संस्कृतमधून शपथ घेतली. यानंतर शहा यांनी संसद भवनातील भाजप संसदीय पक्षाच्या कार्यालयास भेट दिली. तसेच पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी यांना त्यांच्या निवासस्थानी जाऊन अमित शहा भेटले.

लोकसभा निवडणूक आणि उत्तर प्रदेशात भाजपच्या निर्विवाद विजयाचे शिल्पकार मानल्या जाणाऱ्या अमित शहांच्या आगमनामुळे राज्यसभेमध्ये बहुमत मिळविण्यासाठी भाजपचे प्रयत्न गतीमान होतील, असे मानले जात आहे. अर्थात, अधिवेशनावेळी सभागृहामध्ये अधिकाधिक वेळ हजर राहण्याचा दबावही भाजपच्या खासदारांवर पक्षाध्यक्षांच्या उपस्थितीमुळे वाढणार आहे.

Web Title: new delhi news amit shah and smriti irani rajya sabha