लोकसभेत चित्रीकरणावरून गदारोळ

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 26 जुलै 2017

चर्चेची मागणी करणाऱ्यांनाच निलंबित केले जाते. एवढी मोठी शिक्षा कोणीही केली नव्हती. हा विरोधकांचा आवाज दडपण्याचा फॅसिस्ट आणि हुकूमशाही प्रवृत्तीचा सरकारचा अजेंडा आहे.
- मल्लिकार्जुन खर्गे, कॉंग्रेसचे नेते

अध्यक्षांची अनुराग ठाकूर यांना ताकीद; कॉंग्रेसची आगपाखड

नवी दिल्ली: भाजपचे खासदार अनुराग ठाकूर यांनी लोकसभेच्या कामकाजाचे मोबाईलवर केलेल्या चित्रीकरणावरून आज लोकसभेत चांगलाच गदारोळ झाला. या प्रकारावरून खेद व्यक्त केल्यानंतर ठाकूर यांना लोकसभाध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी कडक शब्दांत ताकीद देऊन सोडून दिले. परंतु कॉंग्रेसने यावर आगपाखड केली आहे. चर्चा मागणाऱ्या खासदारांचे निलंबन होते आणि ठाकूर यांना माफी मिळते, हे सरकारचे हुकूमशाहीचे वर्तन आहे, अशी तोफ कॉंग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी डागली.

लोकसभेत सोमवारी झालेल्या गोंधळात पीठासीन अधिकाऱ्यांवर कागद फाडून भिरकावल्याबद्दल कॉंग्रेसच्या सहा खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. हे निलंबन मागे घेण्याची कॉंग्रेसची मागणी आहे. परंतु, सभागृहात कॉंग्रेस खासदारांचा गोंधळ सुरू असताना अनुराग ठाकूर हे मोबाईलवर चित्रीकरण करत असल्याने या नियमबाह्य वर्तनाबद्दल त्यांना निलंबित करण्यात यावे, अशीही कॉंग्रेसची मागणी असून, त्यासाठी लोकसभाध्यक्षांना पत्रही दिले आहे. अशाच चित्रीकरणावरून दोन अधिवेशने निलंबनाची कारवाई ओढवून घेणारे "आप'चे खासदार भगवंत मान यांनीही पत्र दिले आहे. त्या पार्श्वभूमीवर ठाकूर यांच्याविरुद्ध कारवाईच्या मागणीवरून कॉंग्रेसने घातलेल्या गोंधळामुळे लोकसभेचे कामकाज 20 मिनिटांसाठी तहकूब करावे लागले. अखेर, अनुराग ठाकूर यांनी खेद व्यक्त केला, तर भविष्यात असा प्रकार पुन्हा होऊ नये यासाठी सुमित्रा महाजन यांनी कडक शब्दांत समज देऊन यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यामुळे विरोधकांचे समाधान झाले नाही.

इराकमधील भारतीयांच्या स्थितीबद्दल परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या निवेदनानंतर मल्लिकार्जुन खर्गे यांनी खासदारांच्या निलंबनाचा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला. चर्चा मागणाऱ्या खासदारांना निलंबित केले; परंतु अनुराग ठाकूर यांना माफ करण्यात आले, हा कोणता न्याय आहे, असा खर्गे यांचा प्रश्न होता. परंतु पीठासीन अधिकाऱ्यांनी कामकाज तहकूब केल्याने त्यांचे बोलणे पूर्ण होऊ शकले नाही. त्यानंतर सभागृहाबाहेर खर्गे यांनी पत्रकार परिषदेत या संपूर्ण प्रकरणावरून सरकावर हल्ला चढवला. "मॉब लिंचिंग'वर देशात चर्चा होते; पण संसदेत चर्चा होऊ शकत नाही. चर्चेची मागणी करणाऱ्यांनाच निलंबित केले जाते. एवढी मोठी शिक्षा कोणीही केली नव्हती. हा विरोधकांचा आवाज दडपण्याचा फॅसिस्ट आणि हुकूमशाही प्रवृत्तीचा सरकारचा अजेंडा आहे. कॉंग्रेसच्या खासदारांचे निलंबन त्वरित रद्द केले जावे आणि अनुराग ठाकूर यांना निलंबित केले जावे, अशी मागणीही खर्गे यांनी या वेळी केली.

Web Title: new delhi news and loksabha work