ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंचा सरकारला इशारा

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 18 मार्च 2018

जनतेची शक्ती व ताकद राजकीय पक्षांपेक्षा मोठी आहे. त्यामुळे त्यांची आम्हाला गरज नाही. या आंदोलनाची व्याप्ती लक्षात घेता रामलिला मैदान यासाठी योग्य राहील.
अण्णा हजारे, ज्येष्ठ समाजसेवक

आंदोलनासाठी जागा द्या; अन्यथा तुरुंगात सत्याग्रह

नवी दिल्ली : दिल्लीत शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी 23 मार्चपासून होणाऱ्या धरणे आंदोलनात मोदी सरकार जाणूनबुजून अडथळे आणत आहे. सरकारने यासाठी दिल्लीत जागा दिली नाही, तर तुरुंगातही सत्याग्रह करू, असा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिला आहे. मुंबईत नुकताच झालेला शेतकऱ्यांचा मोर्चा हा राज्य स्तरावरील होता व 23 मार्चला दिल्लीत होणारे आमचे धरणे आंदोलन देशभरातील शेतकऱ्यांचे आहे, असेही त्यांनी सांगितले.

हजारे येत्या 23 मार्चपासून दिल्लीत धरणे आंदोलन करणार आहेत; मात्र त्यांच्या आगामी आंदोलनाचा केंद्रबिंदू लोकपाल विधेयकावरून शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे सरकला आहे. लोकपाल कायद्याबाबत विचारले असता, हजारे यांनी तोही विषय आहेच; असे त्रोटकपणे सांगितले. तत्पूर्वी त्यांनी 23 मार्चचे आंदोलन लोकपाल कायद्याला केंद्रास्थानी ठेवून करणार असल्याचे सांगितले होते. या आंदोलनाची रूपरेषा ठरविण्यासाठी आपण पंजाब, हरियाना, उत्तर प्रदेश व मध्य प्रदेशासह देशभराचा दौरा केला व सर्व ठिकाणांहून आपल्याला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, असेही त्यांनी नमूद केले.

हजारेंच्या मागण्या

  • शेतकऱ्यांना उत्पादनाचा योग्य मोबदला मिळावा.
  • शेतमालाच्या विक्रीचा हक्क शेतकऱ्यांना द्यावा.
  • वृद्ध शेतकऱ्यांना दरमहा पाच हजार रुपये निवृत्तिवेतन मिळावे.
  • पीक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांचा व्यक्तिगत विमा उतरवावा.
  • कृषी मूल्य आयोगास स्वायतत्ता द्यावी.
  • आयोगावर शेतकऱ्यांचे प्रतिनिधी असावेत.
Web Title: new delhi news anna anna hazare narendra modi government