भाजपचा 'काळा पैसाविरोधी दिन'

भाजपचा 'काळा पैसाविरोधी दिन'

जेटली ः विरोधकांच्या निर्णयाला सरकारचे प्रत्युत्तर

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गतवर्षी आठ नोव्हेंबरला घोषणा केलेल्या नोटाबंदीच्या निषेधार्थ हा दिवस "काळा दिवस' म्हणून पाळण्याच्या विरोधी पक्षांच्या रणनीतीला भाजप हाच दिवस "काळा पैसाविरोधी दिन' म्हणून साजरा करून जोरदार प्रत्युत्तर देणार आहे. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज ही घोषणा करताना, "ज्यांनी देशाला बरबाद केले, तेच यावर आम्हाला प्रवचने झोडणार?' असा तिखट हल्ला कॉंग्रेसवर चढविला. सत्तारूढ पक्षाच्या या पवित्र्यामुळे यंदा आठ नोव्हेंबर हा देशात राजकीय धुमश्‍चक्रीचा दिवस म्हणून गाजण्याची चिन्हे आहेत.

जेटली म्हणाले, ""आठ नोव्हेंबरला भाजपचे केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री व सर्व नेते देशभरात काळ्या पैशाविरोधात सरकारने जी कडक पावले उचलली त्याची माहिती देतील. यानिमित्त देशाच्या प्रत्येक लोकसभा व विधानसभा मतदारसंघांत काळ्या पैशाविरुद्ध विविध कार्यक्रम आयोजित केले जातील. केंद्रात भाजप सरकार आले त्या क्षणापासून सरकारने काळ्या पैशाविरुद्ध सातत्याने कारवाई केली आहे. मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत काळा पैसा शोधण्यासाठी विशेष तपास गट (एसआयटी) स्थापन करण्याचा निर्णय केला. "एचएसबीसी'सह विदेशी बॅंकांशी व अनेक देशांच्या सरकारांशीही करार करण्यात आले. काळा पैसा प्रिय असणाऱ्यांच्या काळातील अनेक कायदे बदलले गेले. दीर्घकाळ सत्तेची चव चाखणाऱ्या कॉंग्रेसकडे हे उपाय करण्याच्या अनेक संधी होत्या; पण त्यांनी भ्रष्टाचार व काळ्या पैशाविरुद्ध एकही ठोस पाऊल उचलल्याचे मला तरी आठवत नाही.''

कॉंग्रेसने नोटाबंदीवर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना ते म्हणाले की, नोटाबंदीनंतर लाखो कोटी रुपये बॅंकांच्या व्यवस्थेत आले व त्याचे लेखापरीक्षण काटेकोर सुरू आहे. कॉंग्रेसने देशाला बरबाद केले. बॅंकांची खरी खाती लपविताना या पक्षाच्या सरकारने सार्वजनिक क्षेत्रातल्या बॅंकांचे हाल करून त्यांना बुडीत अवस्थेप्रत आणले. आम्ही बॅंकांत नव्याने पैसा ओतला. 2008 ते 2011 या काळात कधीही परतफेड होणार नाही, अशांनाच पैसे वाटले गेले. परिणामी, सार्वजनिक बॅंकांचे दिवाळे निघाले. काळ्या पैशाच्या विरोधातील कारवाईचा, नोटाबंदीचा अर्थच ज्यांना कळला नाही, त्यांना हवाला मार्ग सोयीचा व नोटाबंदी गैरसोयीची वाटणे स्वाभाविक आहे, असाही चिमटा त्यांनी कॉंग्रेसला काढला.

हार्दिक पटेल "बहुरूपी'
गुजरातेत "जीएसटी'मुळे व्यापारी वर्गाचे हाल झाल्याचा आरोप जेटली यांनी फेटाळला. कॉंग्रेसची साथ करणाऱ्या हार्दिक पटेल व इतरांची संभावना त्यांनी "बहुरूपी' अशी केली. ते म्हणाले की, गुजरातमध्ये भाजपच्या विरोधात गेलेले सारे याआधीही त्याच पक्षासाठी काम करत होते. आता ते उघड आले आहेत. हार्दिक बहुरूपी असल्याने त्यांना रात्रीच्या अंधारातच कॉंग्रेस नेत्याची भेट घेणे सोयीस्कर वाटले. या युतीत भाजपला काहीही रस नसून, आम्ही आमच्या निर्भेळ विजयाबद्दल निश्‍चिंत आहोत, असे जेटली म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com