भाजपने प्रस्थापितांसमोर मान तुकवली

भाजपने प्रस्थापितांसमोर मान तुकवली

पहिल्या उमेदवार यादीत पटेलांना प्राधान्य, आयारामांना लॉटरी

नवी दिल्ली : पराभवाच्या अंतरिक भीतीतून जातीपातींचा विचार, नेत्यांच्या मुलाबाळांना व दुसऱ्या पक्षांतून फोडलेल्यांना उमेदवारीची लॉटरी, बंडखोरीची चिन्हे दिसताच, आहे त्या आमदारांवरच भिस्त... ही वर्णने वाचून कोणालाही कॉंग्रेसच्या धोरणाची आठवण होईल. पण सत्तारूढ भाजपने गुजरात निवडणुकीसाठी जी पहिली 70 जणांची यादी आज दिल्लीतून प्रसिद्ध केली, त्यात अल्पसंख्याकांची गर्दी वगळता हेच चित्र दिसत आहे.

खुद्द पंतप्रधानांचे गृहराज्य असलेल्या गुजरातेत मुख्यमंत्री विजय रूपानी, उपमुख्यमंत्री नितीन पटेल आदींसह सध्याचे तब्बल 40 आमदार यादीत आहेत. यंदा विजय अवघड असलेले रूपानी यांना राजकोटमधून लढण्यास सांगण्यात आले आहे. नरेंद्र मोदी, अमित शहा अनेक आमदारांची तिकिटे कापणार, ही कल्पना बदलत्या हवेमुळे भाजपला मनातच ठेवावी लागली आहे. हार्दिक पटेल यांच्या तंबूत गेलेल्या सुरेंद्रनगरच्या वर्षा दोशी या केवळ एका आमदाराचे तिकीट मोदी कापू शकले आहेत.
पटेल समाजाच्या नाराजीची झळ बसणाऱ्या मोदी यांच्या भाजपने 181 उमेदवारांपैकी पहिल्याच यादीत 14 पटेलांना तिकीट दिले आहे. कॉंग्रेस सोडून निवडणुकीच्या तोंडावर भाजपवासी झालेल्या 8 पैकी 5 जणांना उमेदवारी मिळाली आहे. यात कॉंग्रेस नेते विठ्ठलभाई रादाडिया यांचा मुलगा जयेश याला आता भाजपने उमेदवार बनविले आहे. दोन दिवसांपूर्वी पोलिस आयुक्तपदाचा राजीनामा दिलेले पी. सी. बरांडा यांना भिलोड्यातून तिकीट देऊन भाजपने मोदींचे मंत्री सत्यपालसिंह यांची आठवण जागविली आहे.

गोधरातून सी. के. राऊलजी
या 70 पैकी 25 उमेदवार दुसऱ्या टप्प्यातील मतदारसंघांतील आहेत. पहिल्या टप्प्यातील 89 मतदारसंघांपैकी बाकीची नावे येत्या 2 दिवसांत अर्ज भरण्याच्या अखेरच्या क्षणी जाहीर होतील. गोधरा या गाजलेल्या मतदारसंघात भाजप कधीही विजयी झालेला नाही, तेथून सी. के. राऊलजी यांना कॉंग्रेसमधून फोडून भाजपने तिकीट दिले आहे. जगप्रसिद्ध अमूल डेअरीचे सध्याचे अध्यक्ष रामसिंग परमार यांनाही कॉंग्रेसमधून फोडून भाजपने उमेदवारी देऊन मध्य गुजरातेत पाऊल पक्के केले आहे. यादीत केवळ 4 महिला, तर 16 नवे चेहरे आहेत. सुरत-लसिंबायतमधून संगीताबेन पटेल, बडोद्यातून मनीषा वकील, भावनगरमधून विभावरीबेन दवे व खेडब्रहमधून रमीला बेचर या त्या चार महिला आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com