काँग्रेसच्या काळातही खीळ 8 वेळाः मोदी

narendra modi
narendra modi

नवी दिल्लीः "आधीच्या संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकारच्या काळात सहा वर्षांत आठ वेळा विकासदर 5.7 टक्‍क्‍यांपर्यंत खाली आला होता. काही लोकांना निराशा पसरविण्याची सवय असते; परंतु वर्तमानकाळातील तत्कालिक फायद्यासाठी देशाचे भवितव्य संकाटात लोटणार नाही,'' अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्व विरोधकांचा समाचार घेतला.

गेल्या काही दिवसांपासून ढासळत्या अर्थव्यवस्थेवरून मोदी सरकार टीकेचे धनी झाले होते. काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी आर्थिक मुद्द्यांवरून टीकेची धार तीव्र केली होती. त्यातच यशवंत सिन्हा आणि त्यांच्यापाठोपाठ अरुण शौरी यांनीही सरकारच्या धोरणावर टीका केली होती. या सर्व आरोपांना मोदींनी सविस्तर उत्तर आज आपल्या भाषणातून दिले. तसेच सध्या निर्माण झालेल्या मंदीच्या स्थितीतून अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी आपले सरकार पावले उचलत आहे, त्याचे परिणाम लवकरच दिसू लागतील, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.

इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाच्या (आयसीएसआय) सुवर्ण महोत्सवानिमित्त दिल्लीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमासाठी मोदी उपस्थित होते. पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनच्या साह्याने सुमारे तासभर केलेल्या भाषणात मोदींनी सरकारच्या कामाचा लेखाजोखा मांडला. "यूपीए' सरकारची शेवटची तीन वर्षे आणि आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारच्या पहिल्या तीन वर्षांत केलेल्या कामांमधील फरक त्यांनी दाखवून दिला. केंद्र सरकारने रस्ते आणि महामार्गांच्या निर्मितीमध्ये एक लाख 83 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली. "यूपीए' सरकारने शेवटच्या तीन वर्षांत 1300 किलोमीटरच्या रेल्वेमार्गांचे दुहेरीकरण केले, मात्र आम्ही गेल्या तीन वर्षांत 2600 किलोमीटरच्या रेल्वेमार्गांचेचे दुहेरीकरण केले, असे त्यांनी सांगितले. मोटारी, व्यावसायिक वाहने, दुचाकी यांच्या विक्रीत तसेच विमान प्रवासी संख्येत जून 2017नंतर वाढ झाल्याचे मोदींनी नमूद केले.

"चालू खात्यावरील शिल्लक काँग्रेस सरकारच्या काळात 2013-14मध्ये "जीडीपी'च्या उणे 1.7 टक्के होती, ती 2016-17 मध्ये उणे 0.7 टक्‍क्‍यांवर आली आहे. परकी गंगाजळी 2013-14मध्ये 304.2 अब्ज डॉलर होती, ती या वर्षी 17 सप्टेंबरपर्यंत 402 अब्ज डॉलरवर पोचली आहे. वित्तीय तूटही 4.5 टक्‍क्‍यांवरून (2013-14) 3.5 टक्‍क्‍यांपर्यंत (2016-17) कमी झाली आहे,'' असे मोदी यांनी सांगितले.

"एकूण राष्ट्रीय उत्पादनातील रोखीच्या व्यवहारांचे प्रमाण नोटाबंदीपूर्वी 12 टक्के होते. ते नोटाबंदीनंतर नऊ टक्‍क्‍यांवर खाली आले आहे. 8 नोव्हेंबर 2016 हा दिवस भ्रष्टाचारमुक्ती दिन असून, काळ्या पैशांविरोधात सफाई मोहीम सुरू आहे. "हम लकीर के फकीर नहीं', आम्हाला सर्व माहिती आहे, असेदेखील आमचे म्हणणे नाही,'' असे मोदी यांनी सांगितले. केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयांमुळे देशात विकासाचे नवीन पर्व सुरू होईल, असे आश्‍वासन त्यांनी दिले.

मोदी म्हणाले...
- मूठभर लोक समाजव्यवस्था कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहेत
- प्रामाणिक करदात्यांच्या हितांचे रक्षण केले जाईल
- टीकेचेही स्वागत आणि त्याचा गांभीर्याने विचार करतो
- देशात नैराश्‍याची स्थिती निर्माण करणे चुकीचे
- निवडणुका आल्यानंतर रेवड्या वाटण्यापेक्षा आम्ही कठीण मार्ग निवडला
- "प्रायव्हेट सेक्‍टर', "पब्लिक सेक्‍टर'बरोबरच "पर्सनल सेक्‍टर'लाही प्रोत्साहन, त्यासाठी मुद्रा योजना
- काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी पावले उचलली
- 2.1 लाख बनावट कंपन्यांची नोंदणी रद्द केली.
- 8 नोव्हेंबर भ्रष्टाचार मुक्ती दिन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com