पुरस्कार परत करण्याएवढा मी मूर्ख नाहीः प्रकाश राज

वृत्तसंस्था
मंगळवार, 3 ऑक्टोबर 2017

नवी दिल्ली: कर्नाटकमधील पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येबाबत मौन धारण करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अभिनेते प्रकाश राज यांनी सोमवारी (ता.2) टीका केली होती. आपल्याला मिळालेले राष्ट्रीय सन्मान आता परत करावेसे वाटतात, अशी भावनाही त्यांनी बोलून दाखविली. मात्र, काल रात्रीच त्यांनी दोन पावले मागे घेत ""राष्ट्रीय पुरस्कार परत करण्याएवढा मी मूर्ख नाही,' ही टिप्पणी सोशल मीडियावर केली.

प्रकाश राज यांनी काल रात्री आपल्या ट्‌विटर अकाउंटवर एक व्हिडियो पोस्ट केला. त्यानुसार राष्ट्रीय पुरस्कार परत करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली नसल्याचे स्पष्ट केले आहे. व्हिडिओत त्यांनी म्हटले आहे की, राष्ट्रीय पुरस्कार परत करण्याचा निर्णय प्रकाश राज यांनी घेतला असल्याचे वृत्तवाहिन्यांवर दाखविण्यात येत होते; पण हे पुरस्कार परत करण्याएवढा मी मूर्ख नाही. हे पुरस्कार मला माझ्या कामासाठी दिले आहेत आणि मला याचा अभिमान आहे.

प्रकाश राज यांनी काल एका कार्यक्रमात पंतप्रधानांवर टीका केली होती. ""मोदी हे आपल्यापेक्षाही सर्वोत्तम अभिनेते असून, मला मिळालेले पुरस्कार हे खऱ्या अर्थाने मोदींना मिळायला हवे होते,'' असा टोला त्यांनी लगावला होता. याविषयी खुलासा करताना ते म्हणाले, ""गौरी लंकेश यांच्याशी आपली घनिष्ठ मैत्री होती. त्यांच्या हत्येचा आनंद साजरा करण्याच्या घटनेने मला दुःख झाले. अशा आनंद साजरा करणाऱ्यांविरोधात मी रोष व्यक्त केला होता. या कारणावरून मला "ट्रोल' केले गेले. देशाचे पंतप्रधान अशा लोकांना फॉलो करतात आणि त्यांविरोधात कोणीही पावले उचलत नाही. कोणी बोलत नाही. त्यामुळे एक नागरिक या नात्याने मी व्यथित झालो आहे. पंतप्रधानांच्या मौनाचे भय वाटत आहे.'' "आपण कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नसून, देशाचा एक नागरिक या नात्याने या भावना व्यक्त केल्या, असे सांगायला ते विसरले नाहीत.

Web Title: new delhi news I'm not as stupid as giving back the award: Prakash Raj