मोदींचे सर्वसामान्यांकडे दुर्लक्ष: राहुल गांधी

पीटीआय
गुरुवार, 28 सप्टेंबर 2017

चोतीला (गुजरात)/नवी दिल्ली: भाजपचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे अर्थव्यवस्था ढासळत असल्याच्या टीकेचा संदर्भ देत कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी, माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनीही नरेंद्र मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांवर हल्लाबोल चढविला. केंद्र सरकार सर्वसामान्यांचे ऐकत नसल्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था धोक्‍यात आली असल्याचे राहुल यांनी म्हटले आहे.

भाजपचा बालेकिल्ला असलेल्या गुजरातमध्ये रोड शो करत असलेल्या राहुल गांधी एका सभेमध्ये बोलताना म्हणाले की, नरेंद्र मोदी आणि अरुण जेटली यांनी देशाची अर्थव्यवस्था उद्‌ध्वस्त केली असल्याचे भाजपचे वरिष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी लिहिले आहे. याचे मुख्य कारण म्हणजे सरकार शेतकरी, मजूर आणि महिलांचे म्हणणे ऐकत नाही. केवळ 5-10 मोठ्या उद्योगपतींचे ऐकते. हा देश शेतकरी आणि छोटे व्यापारी, मजुरांमुळे चालतो. मात्र, भाजपचे लोक तुमचे म्हणणे ऐकत नाहीत.
एक दिवस टीव्हीवर येतात आणि सांगतात, बंधूंनो तसेच भगिनींनो, आज रात्री 12 वाजल्यापासून 500 रुपये आणि 1000 रुपयांच्या नोटा रद्दी होतील, हाहाहाहा...मजुरांना त्यांची मजुरी रोख स्वरूपात मिळते. कोणीतरी मोदींना सांगितले की, संपूर्ण भारत डेबिट आणि क्रेडिट कार्डचा वापर करतो आणि त्यांनी नोटाबंदी केली, अशी बोचरी टीकाही राहुल यांनी केली.

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनीही ढासळत्या अर्थव्यवस्थेवरून मोदी सरकारवर निशाणा साधला. मी देशभरात फिरतो. आता लोक म्हणत आहेत, अच्छे दिन तर आले नाहीत. हे वाईट दिवस कधी जातील. देशातील ढासळत्या अर्थव्यवस्थेविरोधात अर्थतज्ज्ञांनी आता न घाबरता बोलले आणि लिहिले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

चिदंबरम यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी सरकारवर केलेल्या टीकेचाही उल्लेख केला. कॉंग्रेस मागील 18 महिन्यांपासून अर्थव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त करत आहे. यशवंत सिन्हा यांनी सरकारविरोधात आम्ही करत असलेल्या टीकेचाच पुनरुच्चार केल्याने आम्ही आनंदी असल्याचे ते म्हणाले.

5.7 टक्के विकास दर असल्याचे सांगितले जाते; पण वस्तुस्थिती वेगळीच आहे. विकासदर 3.7 टक्‍क्‍यांपेक्षाही कमी आहे. लोकांच्या मनात भीती निर्माण करणे हे या नव्या खेळाचे नाव आहे, असे ट्विटही चिदंबरम यांनी केले.

Web Title: new delhi news narendra modi people and rahul gandhi