जात जमिनीत गाडून टाका : मीरा कुमार

जात जमिनीत गाडून टाका : मीरा कुमार

आज अर्ज भरणार; साबरमतीतून प्रचार सुरू होणार

नवी दिल्ली: राष्ट्रपतिपदाची निवडणूक "दलित विरुद्ध दलित' अशी जातीच्या नव्हे, तर विचासरणीच्या जोरावर आपण लढत आहोत, असे सांगत विरोधी पक्षांच्या उमेदवार मीरा कुमार यांनी साबरमती येथील महात्मा गांधी आश्रमापासून प्रचार मोहिमेच्या प्रारंभाची घोषणा केली. सर्वोच्च पदाची निवडणूक जातीमुळे चर्चेत आल्याची खंत व्यक्त करताना जात जमिनीत गाडून टाकण्याचे आवाहनही त्यांनी केले.

मीरा कुमार उद्या (ता. 28) उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. दोन दिवसांपूर्वी त्यांनी सर्व मतदार लोकप्रतिनिधींना अंतरात्म्याचा आवाज ऐकून इतिहास रचण्याचे आवाहन करणारे पत्र पाठविले होते. तत्पूर्वी आज पत्रकार परिषद घेऊन त्यांनी या निवडणुकीबद्दलची भूमिका मांडली. मात्र, या महत्त्वाच्या पत्रकार परिषदे वेळी त्यांच्यासमवेत कॉंग्रेसचे माध्यम विभागाचे प्रमुख रणदीप सुरजेवाला वगळता अन्य कोणताही बडा नेता उपस्थित नव्हता.

सोनिया गांधींच्या नेतृत्वाखाली एकत्र आलेल्या 17 पक्षांनी सर्वसंमतीने उमेदवारी दिल्याबद्दल मीरा कुमार यांनी कृतज्ञता व्यक्त केली. या पक्षांची एकजूट समान विचासरणीच्या आधारे आहे. लोकशाही, सामाजिक न्याय, सर्वसमावेशकता, माध्यमांचे स्वातंत्र्य, दारिद्य्र निर्मूलन, जातीव्यवस्थेचा अंत ही मूल्ये या विचारसरणीचे अभिन्न अंग असून, त्यावर आपली नितांत श्रद्धा आहे आणि आणि या विचारसरणीच्या जोरावरच आपण ही लढाई लढणार असल्याचे मीरा कुमार म्हणाल्या.

ही निवडणूक दलित या मुद्द्यावरून चर्चेत असल्याबद्दल नाराजी व्यक्त करताना मीरा कुमार यांनी जातीला आता गाठोड्यात बांधून जमिनीत पुरायला हवे, अशी टिप्पणीही त्यांनी केली. त्या म्हणाल्या, निवडणुकीतील जातीच्या उल्लेखामुळे समाजाची वास्तविकता समोर येत आहे. समाज कशा पद्धतीने आकलन करतो हे दिसते आहे. याआधी राष्ट्रपतिपदासाठी निवडणूक झाली त्या वेळी तथाकथित उच्च जातीचे उमेदवार असताना तेव्हा त्यांच्या जातीची नव्हे; तर गुणवैशिष्ट्यांची चर्चा झाली. आता आपण आणि रामनाथ कोविंद हे दलित उमेदवार असल्यामुळे दोघांच्या गुणांऐवजी दलित असण्यावरच चर्चा केली जाते आहे. समाजाने आता पुढे जावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

सर्व आरोप निराधार
या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा मीरा कुमार यांच्यावर बाबू जगजीवनराम प्रतिष्ठानच्या नावाखाली सरकारी बंगला बळकावल्याचे आरोपसत्र सुरू झाले आहे. यावर खुलासा करताना सर्व आरोप पूर्णपणे निराधार आणि चारित्र्यहनन करणारे आहेत, असे मीरा कुमार म्हणाल्या. संबंधित बंगला सरकारने सरकारी संस्थेच्या कार्यालयासाठी दिला आहे, तर इतर आरोपही नियम आणि कायद्यांच्या आधारे पारदर्शकतेने जनतेसमोर खुलेपणाने ते निकाली निघाले आहेत, असा दावा मीरा कुमार यांनी केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com