मोदींमुळे पाकचे काश्‍मीरमध्ये गैरवर्तन: राहुल गांधी

वृत्तसंस्था
गुरुवार, 17 ऑगस्ट 2017

कॉंग्रेसच्या दबावामुळेच महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमधील भाजप सरकारला शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी लागली.
- राहुल गांधी, कॉंग्रेस उपाध्यक्ष

पंतप्रधानांप्रमाणे वागण्याचाही टोला

बंगळूर: नरेंद्र मोदी सरकारच्या जम्मू-काश्‍मीर धोरणावर जोरदार टीकास्त्र सोडताना कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी, मोदींच्या धोरणाने अडचणीत असलेल्या या राज्यात गैरवर्तन करण्यासाठी पाकिस्तानला मोकळीक मिळवून दिली असल्याचा आरोप केला.

पंतप्रधान भारतीयांच्या भावनेचे प्रतिनिधित्व करतात आणि आता वेळ आली आहे, की नरेंद्र मोदींनीही पंतप्रधानांप्रमाणे काम करण्यास सुरवात केली पाहिजे, असा टोला राहुल यांनी बंगळूरमध्ये आयोजित मेळाव्यात बोलताना लगावला.

ते म्हणाले की, मोदी यांनी जम्मू-काश्‍मीरमध्ये तिरस्कार आणि संतापाचे वातावरण निर्माण केले आहे. त्याचा फायदा पाकिस्तान उठवत आहे. आम्ही खोऱ्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी दहा वर्षे कठोर परिश्रम घेतले. मात्र, मोदी सरकारने केवळ एका महिन्यातच सर्व काही संपविले. गैरवर्तन आणि बंदुकीच्या गोळीने खोऱ्यातील लोकांच्या समस्या सुटणार नाहीत; तर त्यांना स्वीकार केला पाहिजे.

काही दिवसांपूर्वी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग भारतात आले, तेव्हा पंतप्रधान मोदींनी त्यांना झोक्‍यावर झुलविले. नेमक्‍या त्याच काळात एक हजार चिनी सैनिकांनी घुसखोरी केली, असा हल्लाबोल चढवत राहुल गांधींनी 15 ऑगस्टच्या भाषणादरम्यान मोदी चीनच्या घुसखोरीविषयी काही बोलले? असा प्रश्‍न उपस्थित केला.

सरकारच्या परराष्ट्र धोरणावरही प्रहार करताना राहुल गांधी म्हणाले, भारताचे शेजारी देश तसेच रशियालाही मोदी वेगळे पाडत आहेत. मोदी त्यांना थांबवू शकत नाहीत. आम्ही सत्तेत असताना पाकिस्तान आणि चीन वगळता सर्व शेजारी देश आपल्या बाजूने होते. आपल्या देशाच्या इतिहासात पहिल्यांदा रशिया पाकिस्तानला शस्त्रास्त्र विक्री करत आहे.

Web Title: new delhi news rahul gandhi kashmir pak and narendra modi