काँग्रेस अध्यक्षपदासाठी राहुल गांधींचा अर्ज

काँग्रेस अध्यक्षपदासाठी राहुल गांधींचा अर्ज

औपचारिक घोषणा 11 डिसेंबरला होणार; तब्बल 89 अनुमोदन संच

नवी दिल्ली: अंतर्गत लोकशाहीच्या मुद्यावरून सत्ताधारी भाजपने काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला असताना, अपेक्षेप्रमाणे काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी राहुल गांधी यांचाच एकमेव अर्ज आला; तर खुद्द सोनिया गांधी, कार्यकारिणी सदस्य आणि प्रदेश नेत्यांनी 89 अनुमोदन संचांद्वारे या उमेदवारीला पाठिंबा दिला. त्यामुळे अध्यक्षपदी राहुल यांच्या निवडीला आता अवघे काही तास उरले आहेत. मात्र "पारदर्शक निवडणूक प्रक्रिये'मुळे औपचारिक घोषणा अर्ज माघारीच्या दिवशी (11 डिसेंबर) होईल.

उमेदवारी अर्ज भरण्याच्या अंतिम दिवशी आज "24 अकबर मार्ग' या काँग्रेस मुख्यालयात जत्राच भरली होती. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, कार्यकारिणीचे सदस्य, सरचिटणीस, काँग्रेसशासित राज्यांचे मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री, खासदार, प्रदेशाध्यक्ष, विधिमंडळ पक्षनेते अशी नेत्यांची मांदियाळीच मुख्यालयात राहुल गांधींच्या पाठिंब्यासाठी जमली होती. अर्ज दाखल करण्यापूर्वी राहुल गांधी यांनी राजघाटावर जाऊन महात्मा गांधींच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर साडेदहाच्या सुमारास ते मुख्यालयात पोचले. तेथे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी राहुल गांधींना टिळा लावून शुभेच्छा दिल्या. यानंतर राहुल यांनी निवडणूक निर्णय अधिकारी मुल्लापल्ली रामचंद्रन, मधुसूदन मिस्त्री आणि भुवनेश्‍वर कालिता यांच्याकडे अर्ज सादर केला.

तब्बल 89 अनुमोदन संच कार्यकारिणी आणि प्रदेश शाखांतर्फे सादर करण्यात आले आहेत. प्रत्येक संचावर दहा जणांच्या सह्या असल्याने 890 जणांनी राहुल यांच्या उमेदवारीला अनुमोदन दिले असून, उद्या आलेल्या सर्व उमेदवारी अर्जांची छाननी होईल, असे निवडणूक निर्णय अधिकारी मुल्लापल्ली रामचंद्रन यांनी सांगितले. राहुल गांधींना पाठिंबा देणारे सर्वाधिक म्हणजे नऊ अनुमोदन संच उत्तर प्रदेशातून, तर महाराष्ट्रातून तीन संच आल्याचे समजते. महाराष्ट्रातून प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव ठाकरे, हुसेन दलवाई, मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम, रजनी पाटील यांनी राहुल गांधींच्या पाठिंब्याचा अनुमोदन संच दिला. या वेळी सुशीलकुमार शिंदेही उपस्थित होते.

दुसरे अधिकारी भुवनेश्‍वर कालिता यांनी काँग्रेस अध्यक्ष निवडणूक प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक असल्याचा दावा केला; तर या निवडणुकीवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करणाऱ्या भाजपवर मधुसूदन मिस्त्री यांनी टीकास्त्र सोडले. काँग्रेसला प्रश्‍न विचारण्याआधी भाजपने आपल्या पक्षाचा अध्यक्ष कसा निवडला, हे सांगावे, असा खोचक प्रतिसवाल केला.

ढिसाळ नियोजन
राहुल यांच्या निवडीच्या या निर्णायक घडमोडींचे वार्तांकन करण्यासाठी मोठ्या संख्येने माध्यम प्रतिनिधी येणार, याची पूर्व कल्पना मिळूनही काँग्रेसच्या माध्यम विभागाकडून त्याबाबतचे नियोजन मात्र अत्यंत ढिसाळ होते. कडेकोट सुरक्षेमुळे माध्यम प्रतिनिधींना लहानशा जागेत उभे करण्यासाठी धावपळ करणारे सुरक्षारक्षक आणि नेत्यांशी बोलण्यासाठी धडपडणारे पत्रकार यामुळे त्यांच्यात जोरदार खडाजंगीही झाली. याच गोंधळामुळे राहुल गांधींनी माध्यमांना सामोरे जाण्याचे टाळले.

"हात की सफाई'चा हिसका
काँग्रेसच्या सर्व दिग्गज नेत्यांच्या हजेरीमुळे मुख्यालयात कडेकोट सुरक्षा व्यवस्था असताना पश्‍चिम बंगालचे प्रदेशाध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांचे स्वीय सहायक प्रदीप्त राजपंडित यांचा खिसा कापला गेला. मुख्यालयातील सभागृहामध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना राहुल यांच्या उमेदवारीसाठी पश्‍चिम बंगाल काँग्रेसचे पदाधिकारी अनुमोदन संच देत असतानाच हा प्रकार घडला. या सभागृहामध्ये काँग्रेसचे नेते, पदाधिकारी आणि प्रतिनिधी (डेलिगेट्‌स) यांनाच प्रवेश होता. असे असताना तेथील उपस्थिताचा खिसा साफ झाल्यामुळे आश्‍चर्य व्यक्त केले जात होते.

राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पक्षाच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी राहुल गांधींना "डार्लिंग' (काँग्रेसला प्रिय) असे संबोधले; तर भाजपमधून पक्षात दाखल झालेले पंजाबचे मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांनी "बब्बर शेर' असे म्हणत शुभेच्छा दिल्या. काँग्रेससाठी आजचा दिवस ऐतिहासिक आहे. पक्षाध्यक्षपदासाठी राहुल हेच योग्य आहेत, असे पक्षाचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी म्हटले आहे. राहुल यांच्यात पंतप्रधानपदाचे सर्व गुण आहेत. ते चांगले पंतप्रधान होतील, असे पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com