राहुल यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्याचा राजीनामा

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 19 ऑगस्ट 2017

नवी दिल्ली: काँग्रेसच्या समन्वय केंद्राचे सदस्य आणि राहुल गांधींच्या निकटवर्ती वर्तुळातील मानले जाणारे आशिष कुलकर्णी यांनी काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर टीकास्त्र सोडत राजीनामा दिला. डाव्या विचासरणीच्या, तसेच अल्पसंख्याक केंद्रित राजकारणाला काँग्रेस प्राधान्य देत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मात्र, काँग्रेसने आशिष कुलकर्णी हे पक्षाचे नेते नव्हे तर कार्यालयात काम करणारे कर्मचारी असून त्यांना फारसे महत्त्व देण्याची गरज नाही, असा पवित्रा घेतला आहे.

मुंबईकर असलेले आणि नारायण राणेंसोबत शिवसेनेतून काँग्रेसवासी झालेल्या आशिष कुलकर्णी यांच्याकडे पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या मदतीची जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्यानंतर "वॉर रूम'मधील समन्वय केंद्राचेही तसेच महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाच्या मालमत्तेशी संबंधित कामही त्यांच्याकडे होते. या समन्वय केंद्राकडे राहुल गांधींचे बारकाईने लक्ष असल्याचे काँग्रेसमध्ये बोलले जाते. त्या पार्श्‍वभूमीवर कुलकर्णी यांचीही राहुल यांच्या निकटवर्ती वर्तुळात गणना केली जाते. मात्र, त्यांनी पक्षाच्या कार्यपद्धतीवर आरोपांची फैर झाडणारे राजीनामा पत्र राहुल गांधींना पाठविले. अर्थात, यात राहुल गांधींवर टीका केली नसली, तरी अन्य वरिष्ठ नेत्यांच्या कार्यपद्धतीला लक्ष्य केले असून, प्रियंका गांधींना पुढे आणण्याची अफवा वरिष्ठांकडून पसरविली जात असल्याचे कुलकर्णी यांनी म्हटले आहे.

काँग्रेसचे वरिष्ठ नेते अजय माकन यांनी या प्रकरणाला फारसे महत्त्व देण्यास नकार देताना "कोण आशिष कुलकर्णी,' असा प्रतिप्रश्‍न केला. कोणीही उठून राहुल गांधींबद्दल किंवा काँग्रेसबद्दल बोलत असेल, तर प्रसारमाध्यमांनी अशा व्यक्तीला का महत्त्व द्यावे, असे ते म्हणाले.

Web Title: new delhi news rahun gandhi office employee resign