शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावरून शेट्टी-भाजपची खडाजंगी

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 20 जुलै 2017

शेतकऱ्यांचे प्रश्‍न कसे मांडावेत, हे मला शिकवू नका. भाजपला सत्तेवर आणण्यात आपलाही सहभाग होता.
- राजू शेट्टी, खासदार, स्वाभिमानी शेतकरी संघटना

समस्या मांडू न दिल्याच्या निषेधार्थ सभात्याग

नवी दिल्ली: शेतकऱ्यांचे प्रश्‍न संसदेत मांडण्यावरून "एनडीए'चे सदस्य असलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी आणि सत्ताधारी भाजपदरम्यान आज लोकसभेमध्ये जोरदार खडाजंगी झाली. यादरम्यान संतप्त झालेल्या शेट्टी यांनी "भाजपला सत्तेत बसविण्यात आपलाही सहभाग होता', अशी उद्विग्नता व्यक्त केली आणि शेतकऱ्यांच्या समस्या मांडू दिल्या जात नसल्याचा निषेध करत सभात्यागही केला.

लोकसभेत शून्यकाळात "एनडीए'च्या घटक पक्षांमध्ये जुंपल्याचे दिसून आले. कर्जमाफी आणि शेतीमालाला उत्पादन खर्चावर 50 टक्के नफा मिळून दीडपट "एमएसपी' मिळावी या मागणीसाठी दीडशेहून अधिक शेतकरी संघटनांची संघर्ष यात्रा दिल्लीत असून जंतरमंतरवर कालपासून धरणे सुरू आहे. आज त्याचा दुसरा दिवस होता. या संघर्ष यात्रेच्या समन्वय समितीचे सदस्य असलेले राजू शेट्टी यांनी शून्यकाळात हा मुद्दा उपस्थित करून केंद्र सरकारवर तोफ डागली. देशभरातील शेतकरी आंदोलन करत असून, हक्क मागणे गुन्हा आहे काय, असा प्रश्‍न करताना त्यांनी मंदसौरच्या आंदोलनात पोलिसांनी केलेल्या अत्याचारावरून टीका केली. एका शेतकऱ्याची पोलिस ठाण्यात बोलावून हत्या करण्यात आली. "25 वर्षांपासून आपण शेतकऱ्यांचे प्रश्‍न मांडतो आहोत; परंतु पोलिसांचा असा व्यवहार पाहिला नाही,' अशा शब्दांत शेट्टी यांनी मध्य प्रदेश प्रशासनावर टीकास्त्र सोडताच भाजपचे खासदार राकेशसिंह आणि गणेशसिंह यांनी अडथळा आणणे सुरू केले. यामुळे संतप्त झालेल्या शेट्टी यांनी, शेतकऱ्यांचे प्रश्‍न कसे मांडावेत, हे मला शिकवू नका. भाजपला सत्तेवर आणण्यात आपलाही सहभाग होता. आपणही तुमच्यासाठी मते मागितली, असे फटकारले आणि या हत्येची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली. दीडपट "एमएसपी' आणि कर्जमाफीचे आश्‍वासन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिले नव्हते काय, असा प्रश्‍नही शेट्टी यांनी केला. याच दरम्यान लोकसभाध्यक्षांनी अन्य खासदाराला बोलण्यासाठी परवानगी दिली. यामुळे ध्वनिक्षेपक बंद झाल्याने शेट्टी यांच्या संतापात आणखी भर पडली. अखेर त्यांनी "आपल्याला शेतकऱ्यांशी निगडित प्रश्‍न मांडू दिले जात नाहीत, याचा धिक्कार करतो', असे म्हणत सभात्याग केला.

Web Title: new delhi news raju shetty bjp government and sansad