'आश्‍चर्याचा घटक' मोदींकडून कायम!

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 20 जून 2017

नवी दिल्ली: राजभवनातून थेट राष्ट्रपतिभवनाकडे वाटचाल करणारे आणि राज्यपालपदावरुन थेट राष्ट्रपतिपदाचे उमेदवार होणारे भाजपचे उमेदवार रामनाथ कोविंद हे या प्रकारचे दुसरे उमेदवार ठरावेत. याआधी प्रतिभा पाटील यांनी राजस्थानच्या राज्यपालपदावरून थेट राष्ट्रपतिपद प्राप्त केले होते. डॉ. शंकरदयाळ शर्मा हे महाराष्ट्राचे राज्यपाल होते; परंतु त्यानंतर प्रथम ते उपराष्ट्रपती झाले होते व त्यानंतर त्यांना त्याच मालिकेत राष्ट्रपतिपदावर बढती मिळाली होती.

नवी दिल्ली: राजभवनातून थेट राष्ट्रपतिभवनाकडे वाटचाल करणारे आणि राज्यपालपदावरुन थेट राष्ट्रपतिपदाचे उमेदवार होणारे भाजपचे उमेदवार रामनाथ कोविंद हे या प्रकारचे दुसरे उमेदवार ठरावेत. याआधी प्रतिभा पाटील यांनी राजस्थानच्या राज्यपालपदावरून थेट राष्ट्रपतिपद प्राप्त केले होते. डॉ. शंकरदयाळ शर्मा हे महाराष्ट्राचे राज्यपाल होते; परंतु त्यानंतर प्रथम ते उपराष्ट्रपती झाले होते व त्यानंतर त्यांना त्याच मालिकेत राष्ट्रपतिपदावर बढती मिळाली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयात आश्‍चर्याचा आणि लोकांना चकित करण्याचा घटक असतो. त्यामुळे राष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराबाबत ते देशाला कोणता धक्का देतील याबाबत उत्कंठा होती. राजकीय वर्तुळातील चर्चेत विविध कयास बांधले जात होते. एका मुद्द्यावर मात्र या राजकीय वर्तुळात एकमत होते, की मोदी अशा व्यक्तीकडे राष्ट्रपतिपद देतील की जी व्यक्ती त्यांच्या "चौकटी'त बसणारी असेल. याचा अर्थ स्पष्ट होता की, मोदींच्या पेक्षा ही व्यक्ती "स्वतंत्र विचाराची' नसेल. तसेच राजकीयदृष्ट्या मोदी यांच्या व्यक्तिमत्त्व व नेतृत्वाच्या पुढे जाणारी ही व्यक्ती नसेल. म्हणजेच एखाद्या राजकीय व्यक्तीला उमेदवारी देतानाही त्यांचे राजकीय व्यक्तिमत्त्व मोदींच्या उंचीच्या वर जाणारे नसेल याची खबरदारी घेतली जाईल आणि घडलेही तसेच. एक प्रकारे कोविंद यांच्या नावाच्या घोषणेतही मोदी यांनी "एलिमेंट ऑफ सरप्राइज' किंवा "आश्‍चर्याचा घटक' राखलाच.

विरोधी पक्षांच्या एकतेत फूट पाडण्यासाठी मोदी "चाल' खेळतील असा तर्कही केला जात होता. त्यातून जी नावे चर्चेत येत होती त्यामध्ये काही शास्त्रज्ञ-संशोधक, काही माजी न्यायाधीश यांची नावे चर्चेत आली. या तर्कांमध्ये मोदी कदाचित एखाद्या दाक्षिणात्य व्यक्तीची निवड करतील अशी एक चर्चा होती. भाजपला "दक्षिण विस्तारा'च्या दृष्टीने मदत व्हावी, हा उद्देश त्यामागे असेल असे मानले जात होते. परंतु मोदी यांनी उत्तर प्रदेशातील नेत्याचीच उमेदवार म्हणून निवड केली.
राष्ट्रपतींच्या निवडीनंतर बरोबर एक महिन्याने उपराष्ट्रपतींची निवड होते. म्हणजे 24 जुलै रोजी वर्तमान राष्ट्रपतींची मुदत संपते आणि 25 जुलै रोजी नवे राष्ट्रपती आपल्या पदाची सूत्रे होती घेतात. त्याचप्रमाणे वर्तमान उपराष्ट्रपतिपदाची मुदत 24 ऑगस्ट रोजी संपते आणि 25 ऑगस्ट रोजी नवे उपराष्ट्रपती सूत्रे हाती घेतील.

उपराष्ट्रपतिपदाचीही उत्सुकता
आता यानंतर भाजपतर्फे उपराष्ट्रपतिपदासाठीच्या उमेदवाराबाबत चर्चा सुरु झालेली आहे. कदाचित उपराष्ट्रपतिपदासाठी एखाद्या दाक्षिणात्य नेत्याची निवड केली जाईल, अशी अपेक्षा आहे. पूर्वीही विभागीय आणि राजकीय समतोल पाळला जात असे. राजेंद्रप्रसाद राष्ट्रपती असताना राधाकृष्णन हे उपराष्ट्रपती होते. त्याचप्रमाणे ग्यानी झैलसिंग हे राष्ट्रपती असताना आर. वेंकटरमण उपराष्ट्रपती होते, तर शंकरदयाळ शर्मा राष्ट्रपती असताना के. आर. नारायणन हे उपराष्ट्रपती होते. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम राष्ट्रपती असताना भैरोसिंह शेखावत उपराष्ट्रपती होते. ही परंपरा लक्षात घेता राष्ट्रपतिपद उत्तरेतल्या व्यक्तीकडे असल्यास उपराष्ट्रपतिपद अन्य विभागांतील व्यक्तीकडे जाऊ शकते.

Web Title: new delhi news ramnath kovind and Rashtriya Bhavana