कॅडबरीकडून 580 कोटींची करचुकवेगिरी

वृत्तसंस्था
गुरुवार, 14 सप्टेंबर 2017

कंपनीकडून करचुकवेगिरीसाठी लाच स्वीकारणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांचा शोध सीबीआय घेईल. त्यानंतर त्यांच्यावर खात्यांतर्गत अथवा गुन्हेगारी खटला दाखल करण्याचा निर्णय घेण्यात येईल.
- व्ही. के. चौधरी, केंद्रीय दक्षता आयुक्त

उत्पादक कंपनी मोंडलेजविरोधात गुन्हा; सरकारी अधिकाऱ्यांना लाच

नवी दिल्ली: कॅडबरी चॉकलेट्‌सची उत्पादक कंपनी मोंडलेजविरोधात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) गुन्हा दाखल केला आहे. कंपनीने सरकारी अधिकाऱ्यांना लाच देऊन 580 कोटी रुपयांचे उत्पादन शुल्क चुकविल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

केंद्रीय दक्षता आयोगाने याबाबत सीबीआयला निर्देश दिले होते. केंद्रीय दक्षता आयुक्त के. व्ही. चौधरी म्हणाले, ""मोंडलेजच्या हिमाचल प्रदेशमधील उत्पादन प्रकल्पांबाबत हे आरोप झाले आहेत. कंपनीने करचुकवेगिरी करण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांना लाच दिल्याची चौकशी आयोगाकडून सुरू होती. याप्रकरणी प्राथमिक तपास आयोगाने केला होता. या तपासावेळी मोठ्या प्रमाणात सापडलेली कागदपत्रे सीबीआयकडे सुपूर्द करण्यात आली होती. दक्षता आयोगाने केलेल्या शिफारशीनंतर सीबीआयकडून मोंडलेझ कंपनीचा तपास सुरू झाला आहे. याचआधारे अखेर सीबीआयने मोंडलेजविरोधात गुन्हा दाखल केला आहे.''

सवलती असल्याचा कंपनीचा दावा
इंडियाच्या प्रवक्‍त्याने याबाबत प्रतिक्रिया देताना कंपनीच्या अधिकाऱ्यांनी कायदेशीर कक्षेत राहून सर्व बाबी केल्याचे स्पष्ट केले. तसेच, हिमाचल प्रदेशमधील उत्पादन प्रकल्पाला करसवलती असल्याचा दावा प्रवक्‍त्याने केला. सध्या हे प्रकरण कायदेशीर टप्प्यावर असल्याने प्रवक्‍त्याने कंपनीवर झालेल्या आरोपांबाबत अधिक स्पष्टीकरण देण्यास नकार दिला.

Web Title: new delhi news Tax evasion of Rs 580 crores from Cadbury