ब्रजेश ठाकूरसह १९ जण दोषी; शिक्षेची सुनावणी २८ जानेवारीला

पीटीआय
Tuesday, 21 January 2020

काय आहे प्रकरण ?
टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (टिस) या संस्थेने मे २०१८ मध्ये बिहार सरकारला सादर केला होता. बिहार सरकारकडे सादर झालेल्या अहवालानुसार, निवारागृहातील मुलींच्या जेवणार झोपेच्या गोळ्या मिसळून त्यांना बेशुद्ध केले जात असते. यानंतर ठाकूर आणि काही बाहेरील व्यक्ती या मुलींवर अत्याचार करत. अनेक मुलींना आपल्यावर अत्याचार झाल्याचे दुसऱ्या दिवशीच समजत असे. ठाकूरच्या निवारागृहातील ४२ पैकी ३४ मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचे डॉक्‍टरांना आढळून आले होते. यामुळे नैराश्‍य येऊन अनेक मुलींना स्वत:ला इजाही करून घेतली होती. या घटनेबाबत माध्यमांमध्ये प्रसिद्धी होताच देशभर संतापाचे वातावरण निर्माण झाले होते.

नवी दिल्ली - मुझफ्फरपूर निवारागृहातील मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचारप्रकरणी दिल्ली येथील न्यायालयाने आज माजी आमदार ब्रजेश ठाकूर आणि इतर १८ जणांना दोषी ठरविले. ठाकूर याला अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी पॉक्‍सो कायद्यांतर्गत दोषी ठरविले. त्याच्याविरोधातील सामूहिक बलात्काराचा गुन्हाही सिद्ध झाला आहे. २०१८ मध्ये हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर देशभर संतापाची लाट उसळली होती.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

बिहार पीपल्स पार्टीचा माजी आमदार असलेला ब्रजेश ठाकूर निवारागृह चालवित असे. त्याने आणि त्याच्या मदतीने इतर काहींनी निवारागृहातील अल्पवयीन मुलींवर बलात्कार केल्याचा आरोप झाल्यानंतर त्याला अटक झाली होती. 

जे. पी. नड्डा : चाणाक्ष व्यूहरचनाकार, संघटक

याप्रकरणी ठाकूरसह १२ पुरुष आणि आठ महिलांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला होता. यातील एकाला न्यायालयाने दोषमुक्त करीत उर्वरित जणांना दोषी ठरविले. या सर्वांना २८ जानेवारीला शिक्षा सुनावली जाणार आहे. न्यायालयाने गेल्या वर्षी ३० मार्चला या सर्वांविरोधात आरोपपत्र निश्‍चित करीत त्यांच्यावर बलात्कार आणि अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करणे आणि या प्रकारास साथ देणे, असे आरोप ठेवले होते. तसेच, समाज कल्याण मंत्रालयातील काही अधिकाऱ्यांवरही कर्तव्यात कसूर केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. या प्रकरणी बिहारच्या माजी समाजकल्याण मंत्री मंजू वर्मा यांना राजीनामा द्यावा लागला होता. वर्मा यांचे पतीचे ठाकूरबरोबर मैत्रीचे संबंध होते. 

‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमातून पंतप्रधानांचा पालकांना सल्ला

अहवालामुळे प्रकरण उजेडात आल्यानंतर बिहार सरकारने दोनच दिवसांनी संबंधित निवारा गृहातील मुलींना दुसरीकडे हलविले आणि ११ जणांविरोधात गुन्हा नोंदविला होता. या निवारागृहातील किमान ३० अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याच्या आरोपाची सर्वोच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली आणि नोव्हेंबरमध्ये या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपविली. या प्रकरणाचे गांभीर्य वाढत गेल्यानंतर गेल्या वर्षी ७ फेब्रुवारीला सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार या प्रकरणाची सुनावणी दिल्लीतील पॉस्को न्यायालयात सुरु झाली होती. आज या प्रकरणाचा निकाल लागला. या प्रकरणातील साक्षीदारांनी दिलेल्या साक्षींवर विश्‍वास ठेवता येणार नाही, हा ब्रजेश ठाकूरचा दावाही न्यायालयाने फेटाळून लावला होता. निवारागृहातील मुलींचा खून झाल्याचाही आरोप असून त्या प्रकरणाचा तपास सुरु आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nineteen convicted including Brajesh Thakur in muzaffarpur case