निर्भया प्रकरण : त्या नराधमांना 'तिहार'ने विचारली शेवटची इच्छा!

वृत्तसंस्था
गुरुवार, 23 जानेवारी 2020

जर या दोषींची इच्छा असेल तर फाशी देण्यापूर्वी त्या पूर्ण करता येतील, असेही प्रशासनाने नोटिशीत म्हटले आहे. 

नवी दिल्ली : निर्भया सामूहिक बलात्कार आणि खून प्रकरणातील चारही आरोपींना फाशी देण्याची तयारी तिहार कारागृहात वेगाने सुरू आहे. प्रशासनाने गुरुवारी नोटीस देऊन त्यांची शेवटची इच्छा विचारली. मात्र, त्यावर आरोपींनी काय उत्तर दिले, हे समजू शकलेले नाही. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

निर्भयाप्रकरणी पवनकुमार गुप्ता, मुकेशसिंह, विनय शर्मा आणि अक्षयकुमारसिंह या चारही दोषींना 1 फेब्रुवारीला फाशीची शिक्षा देण्यात येणार आहे. तिहार तुरुंगात याची तयारी सुरू असून, आज त्यांना नोटीस बजावून त्यांची अंतिम इच्छा विचारण्यात आली.

- ...अशा महिलांनाच बलात्काऱ्यांसोबत 4 दिवस जेलमध्ये ठेवा : कंगना रणौत

1 फेब्रुवारीला देण्यात येणाऱ्या फाशीपूर्वी ते शेवटचे कोणाला भेटू इच्छितात, त्यांच्या नावावर काही संपत्ती असल्यास ती कोणाच्या नावे करायची आहे, एखादा धार्मिक ग्रंथ वाचण्याची इच्छा आहे का किंवा एखाद्या धर्मगुरूंना पाचारण करायचे आहे, असे प्रश्‍न त्यांना विचारण्यात आले. जर या दोषींची इच्छा असेल तर फाशी देण्यापूर्वी त्या पूर्ण करता येतील, असेही प्रशासनाने नोटिशीत म्हटले आहे. 

खाणे झाले कमी 

तुरुंगातून देण्यात आलेल्या माहितीनुसार चारही दोषी सध्या अस्वस्थ दिसत असून, आयुष्य संपणार या भीतीने विनय शर्मा याने खाणे सोडले. मात्र, बुधवारी त्याच्यापुढे अन्न ठेवण्यात आले, तेव्हा त्यातील थोडेसे त्याने खाल्ले. पवन कुमारचे खाणे मंगळवारपासून (ता.21) कमी झाले आहे. मुकेशसिंह आणि पवनकुमार गुप्ता यांची दिनचर्या नेहमीप्रमाणे सुरू आहे.

फाशी टाळण्यासाठी जेवढे कायदेशीर पर्याय होते त्याचा वापर मुकेशसिंह याने केला आहे. त्याची दया याचिका राष्ट्रपतींनी फेटाळली आहे. आता अन्य तिघांकडे दया याचिका करण्याचा आणि दोघांकडे सर्वोच्च न्यायालयात सुधारणा (क्‍युरेटिव्ह) याचिका दाखल करण्याचा कायदेशीर उपाय आहे. 

- देशभरात बेरोजगारी डोंगराएवढी; केंद्राकडे मात्र एवढी पदे रिक्त

घरच्यांशी भेटण्यास दिला नकार

फाशीची शिक्षा जाहीर झाल्यानंतर दोषींना त्यांच्या घरच्यांशी भेटण्याची परवानगी देण्यात आली. मात्र, त्यावेळी त्यांनी घरच्यांसोबत बोलण्यास नकार दिला, अशी माहिती तिहार तुरुंगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. 

दोषींना घरातील सदस्यांना आठवड्यातून दोन वेळा भेटण्याची परवानगी आहे. आता त्यांच्या घरच्यांना शेवटची भेट कधी घेता येणार याबाबतचा निश्चित दिवस अजून ठरविण्यात आला नाही. कारण सर्व दोषींनी घरातील सदस्यांना भेटण्यास अजूनही नकार दिला आहे. 

- भारताचा लोकशाही निर्देशांक घसरला; तेरा वर्षांतील नीचांकी पातळी

दोषींसाठी व्यवस्था 

- तिहारच्या तुरुंग क्र. 3 मध्ये वेगवेगळ्या बराकीत चारही दोषींचा मुक्काम 
- प्रत्येक दोषीच्या बराकीबाहेर दोन सुरक्षा कर्मचारी तैनात 
- सुरक्षासाठी तमिळनाडू विशेष पोलिस दलातील हिंदी आणि इंग्रजीचे ज्ञान असणारा एक जवान आणि दुसरा तिहार तुरुंगातील सुरक्षा कर्मचारी 
- प्रत्येक दोन तासांनी सुरक्षा कर्मचाऱ्यांना विश्रांती दिली जाते 
- कामाची पाळी बदलल्यावर दुसरे कर्मचारी रुजू होतात 
- प्रत्येक कैदीसाठी 24 तासांत आठ सुरक्षा कर्मचारी 
- चार कैद्यांसाठी 32 सुरक्षारक्षकांचा पहारा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nirbhaya convicts has no last wish yet says Tihar jail administration