
नवी दिल्ली : स्वातंत्र्याच्या शतकपुर्तीच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी आगामी २५ वर्षाच्या नियोजनाची पायाभरणी करणारा केंद्रीय अर्थसंकल्प डिजिटल स्वरूपात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत सादर केला. मात्र, अर्थसंकल्पाच्या या डिजिटलीकरणामुळे विश्लेषणासाठी छापील प्रतींच्या प्रतिक्षेत असलेल्या विरोधी खासदारांची निराशा झाल्याचे दिसून आले. (Union Budget 2022 PM Narendra Modi meets opposition leader)
अर्थसंकल्पी भाषण सादरीकरणात यावर्षीही अर्थमंत्र्यांनी नवा प्रयोग केल्याचे दिसून आले. मागील वर्षीच्या अर्थसंकल्पात ब्रिफकेस संकल्पना बाजूला ठेवून खातेवही सारख्या हिशेब पुस्तिकेच्या स्वरूपात अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प आणला होता. यावेळी टॅब्लेटवर अर्थसंकल्पाचे भाषण वाचून, यंदाचा अर्थसंकल्प डिजिटल असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न केला. लोकसभेत आतापर्यंत अर्थमंत्र्यांनी पहिल्या रांगेतून अर्थसंकल्प मांडण्याचे संकेत राहिले आहेत. मात्र यंदा अर्थमंत्री सीतारामन यांनी दुसऱ्या रांगेतून भाषण वाचले. विशेष म्हणजे यंदाचे त्यांचे भाषणही छोटेखानी म्हणजेच दीड तासाचे होते. लोकसभेचे कामकाज सकाळी अकराला सुरू होण्याआधी सभागृहात दाखल झालेल्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना मोदी सरकारमधील सर्व महिला मंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या. तर, अर्थसंकल्प मांडल्यानंतर पंतप्रधानांपासून ते वरिष्ठ केंद्रीय मंत्री आणि सत्ताधारी खासदारांनी नंतर अर्थमंत्र्यांवर अभिनंदनाचा वर्षाव केला.
अर्थसंकल्पात नव्या घोषणा होत असताना सत्ताधारी बाकांवरून बाके वाजवून प्रतिसाद मिळतो तर विरोधी बाकांवरून शेरेबाजी होत असते. यामध्ये नेहमीच आघाडीवर राहिलेले तृणमूल कॉंग्रेसचे वरिष्ठ खासदार सौगत रॉय यांची निर्गुंतवणुकीच्या मुद्द्यावरून टिप्पणी आणि राज्यांच्या किती निधी मिळणार हे विरोधी बाकांवरून आलेले सवाल वगळता अर्थसंकल्पी भाषणात फारशी टोकाटोकीही दिसून आली नाही. मात्र, अर्थमंत्र्यांचे भाषण संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधी बाकांवर जाऊन तेथील नेत्यांशी साधलेला संवाद हा विरोधातीलच नव्हे तर सत्ताधारी बाकांवरील खासदारांनाही आश्चर्याचा धक्का देणारा होता. अर्थसंकल्प सादरीकरणाच्या भाषणादरम्यान सोनिया गांधी या उपस्थित नव्हत्या. तर राहुल गांधी हे भाषण संपल्या संपल्या सभागृहाबाहेर गेले. त्यानंतर पंतप्रधान मोदींशी कॉंग्रेसचे गटनेते अधीररंजन चौधरी, उपनेते के. सुरेश, गोव्यातील खासदार फ्रान्सिस्को सार्दीन्हा, आर. एस.पी. चे खासदार एन. के. प्रेमचंद्रन यांच्या गप्पा रंगल्या. पाठोपाठ तृणमूल कॉंग्रेसचे नेते सुदीप बंदोपाध्याय, सौगत रॉय यांच्याशीही पंतप्रधानांच्या गप्पा झाल्या.
छापील अर्थसंकल्प नाहीच!
आतापर्यंत अर्थसंकल्पाच्या प्रती माध्यमांनाच मिळणे बंद झाले होते. आता यामध्ये लोकप्रतिनिधींचाही समावेश झाला असून त्यांना देखील अर्थसंकल्पाचे दस्तावेज डिजिटल स्वरुपात पाहावे लागेल. सभापती ओम बिर्ला यांनी सभागृह सुरू होताच जाहीर केले होते, की संपूर्ण अर्थसंकल्प डिजिटल स्वरुपात उपलब्ध होणार असल्याने खासदारांना अर्थसंकल्पाच्या छापील प्रती मिळणार नाहीत. केवळ अर्थमंत्र्यांच्या भाषणाची प्रत मिळेल आणि अर्थमंत्री देखील डिजिटल भाषण वाचतील. त्यानुसार अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी टॅब्लेटवर वाचून संसदेत अर्थसंकल्पाचे भाषण सादर केले. छापील प्रती मिळणार नसल्याने खासदारांची विशेषतः विरोधी बाकांवरील खासदारांची निराशा झाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.