तुमचं अभिनंदन करायची मला लाज वाटते, गडकरींनी अधिकाऱ्यांना झापलं

सकाळ वृत्तसेवा
Monday, 26 October 2020

उद्घाटनाच्या कार्यक्रमामध्ये खरंतर अधिकाऱ्यांचे, कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करण्याची परंपरा असते पण मला तुमचं अभिनंदन करायची लाज वाटते अशा शब्दांत गडकरी यांनी अधिकाऱ्यांना झापलं.

नवी दिल्ली - केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते आह केंद्रीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या नव्या इमारतीचं उद्घाटन झालं. कामाच्या उभारणीला झालेल्या विलंबावरून नितिन गडकरी यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतलं. उद्घाटनाच्या कार्यक्रमामध्ये खरंतर अधिकाऱ्यांचे, कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करण्याची परंपरा असते पण मला तुमचं अभिनंदन करायची लाज वाटते अशा शब्दांत गडकरी यांनी अधिकाऱ्यांना झापलं.

उद्घाटनाच्या कार्यक्रमानंतर बोलताना नितिन गडकरी म्हणाले की, 2008 मध्ये या इमारतीच्या उभारणीचे निश्चित झाले होते. त्याबाबत 2011 मध्ये निविदा काढण्यात आली. आता दोनशे ते अडिचशे कोटी रुपयांचे हे काम पूर्ण व्हायला 9 वर्षे लागली. या काळात तीन सरकारं आणि आठ अध्यक्ष झाले. त्यानंतर आज काम पूर्ण होत आहे. त्यामुळं अभिनंदन करायला संकोच वाटत आहे. तुमचं अभिनंदन कसं करू? सध्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अध्यक्षांचा या कामाशी काहीच संबंध नाही. पण ज्या महान लोकांनी 2011 ते 2020 काळात हे काम केलं त्यांचे फोटो कार्यालयात लावण्याचा प्रयत्न करा असा टोलाही गडकरींनी लगावला.

दिल्ली ते मुंबई या महामार्गासाठी अब्जावधी रुपयांचा निधी खर्च होणार आहे. इतक्या पल्ल्याचा आणि मोठा प्रोजेक्ट तीन वर्षात पूर्ण होणार हे अभिमानानं आपण सांगत आहे. मात्र दोनशे कोटी रुपयांच्या कामासाठी दहा वर्षे लागली हे अभिनंदन करण्यासारखं तर नाहीच पण मला याची लाज वाटतेय. विकृत विचाराच्या अधिकाऱ्यांनी निर्णय न घेता अडचणी निर्माण केल्या. हे लोक 12 ते 13 वर्षांपासून चिटकून बसले आहेत. नवा अध्यक्ष येतो त्यांना मार्गदर्शन करत बसतात. अधिकाऱ्यांच्या प्रामाणिकपणाविषयी संशय नाही पण त्यांची विचारधारा विषकन्येसारखी आहे. मुख्य महाव्यवस्थापक आणि त्यांसारख्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची परंपरा किती नालायक आहे याचं उदाहरण म्हणजे ही इमारत असल्याचं गडकरी म्हणाले. 

हे वाचा - पंजाबमध्ये रावणाला PM मोदींचा मास्क, जेपी नड्डा राहुल गांधींवर संतापले

प्राधिकरणाच्या या इमारतीचं काम ज्यांनी पाहिलं त्याचा एक संशोधन पेपर तयार करावा. आपण जे लोक घेतो ते लायक नाहीत. संस्थेचं नाव इतकं मोठं आहे तरीही आपण अपय़शी ठरलो. रस्त्याचं काम पूर्ण करण्यापेक्षा कामचुकारपणा करणाऱ्यांना हाकललं. त्यांना सेवामुक्त केलं हेच माझं उद्दिष्ट आहे. मंत्र्यांचे अधिकार काय असतात हे मला माहिती आहे. लोकांचं वाईट करावं अशी भावना नाही पण अशा लोकांची धुलाई करण्याशिवाय पर्यायसुद्धा नाही. आता पूर्ण झालेलं काम बघण्यासाठी तीन सरकारं बदलली. मग तुमचं कशाला अभिनंदन करु. मला तुमचं अभिनंदन करायची लाज वाटते अशा शब्दांत नितिन गडकरी यांनी सुनावलं.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nitin gadkari slam to senior officers deley for work