बिहारमध्ये कोरोना लस मिळणार फ्री; नव्या 20 लाख रोजगारांचीही घोषणा

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 16 December 2020

नितीश कुमार यांच्या कॅबिनेट बैठकीत सरकारच्या पाच वर्षांच्या योजनेची आखणी करण्यात आली.

पाटणा- नितीश कुमार यांच्या कॅबिनेट बैठकीत सरकारच्या पाच वर्षांच्या योजनेची आखणी करण्यात आली. या बैठकीत नितीश कुमार यांनी बिहारच्या लोकांना फ्रीमध्ये कोरोना लस देणार असल्याची घोषणा केली आहे. तसेच २० लाख नवे रोजगार निर्माण करणार असल्याचं ते म्हणाले आहेत. असे असले तरी २० लाख रोजगार कसे निर्माण केले जातील, याबाबत माहिती देण्यात आलेली नाही. केवळ एवढंच सांगण्यात आलंय की, सरकारी आणि बिगर सरकारी क्षेत्रात २० लाख रोजगार निर्माण केले जातील.

शेतकऱ्यांना आंदोलन करता येणार की नाही? सर्वोच्च न्यायालय देणार निर्णय

भाजपने निवडणूक प्रचारादरम्यान बिहारमधील लोकांना फ्रीमध्ये कोरोनो लस देण्यात येईल, असं जाहीर केलं होतं. आरजेडी नेता तेजस्वी यादव यांनी सत्तेत आल्यास राज्यात १० लाख रोजगार निर्माण करणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर भाजपने १५ लाख रोजगार आणि ४ लाख सरकारी नोकरी निर्माण करणार असल्याचे आश्वासन दिले होते. त्याचीच पूर्ती म्हणून फ्री कोरोना लस आणि २० लाख रोजगारांची घोषणा नितीश कुमारांच्या कॅबिनेट बैठकीत करण्यात आली. बिहारमधील लोकांना कधीपर्यंत कोरोनो लस मिळेल, याबाबत काही सांगण्यात आलेलं नाही.

आत्मनिर्भर भारतच्या ७ निश्चय पार्ट-२ नुसार, युवा शक्ती बिहार की प्रगती किंवा सशक्त महिला सुरक्षा अशा कार्यक्रमांअंतर्गत पदवी प्राप्त करणाऱ्या महिलांना आता ५० हजार रुपयांची आर्थिक मदत आणि इंटर पास केल्यानंतर अविवाहित महिलांना २५ हजार रुपयांची मदत करण्याची तरतूद करण्यात आली आहे. तसेच महिलांमध्ये उद्योजकता वाढवण्यासाठी त्यांना ५ लाख रुपयांचे व्याजमुक्त कर्ज देण्याची योजना सुरु करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. याशिवाय प्रत्येक शेतापर्यंत सिंचन हे जूने आश्वासन नितीश कुमारांनी पुन्हा एकदा बोलून दाखवले. तसेच शहरात राहणाऱ्या बेघर लोकांना बहुमजली इमारत बांधून घर उपलब्ध करुन देण्यात येईल. 

समुद्रात भारताची ताकद वाढणार, नौदल 38 ब्राह्मोस क्षेपणास्त्र खरेदी करण्याच्या...

कोरोना महामारीच्या संकटात राज्यातील आरोग्य व्यवस्थेमधील त्रूटी समोर आल्या. त्यादृष्टीने आरोग्य केंद्र सुधारण्यावर आणि टेली मेडिसिनद्वारे ग्रामीन भाग जिल्हा हॉस्पिटलशी जोडण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. तसेच शेतकऱ्यांचे उत्पन्न एमएसपीवर खरेदी करण्याचे आश्वासन देण्यात आले. दरम्यान, बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला. तर नितीश कुमार यांच्या नेतृत्वातील जेडीयू तिसऱ्या क्रमांकावर ढकलली गेली. पण, ठरल्यानुसार नितीश कुमार मुख्यमंत्री झाले आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nitish Kumar approves free coronavirus vaccine for all in Bihar generate 20 lakh jobs