'भाजपच्या आग्रहाखातर मुख्यमंत्री पदी; माझी इच्छा नव्हतीच'

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 15 November 2020

बिहार विधानसभेच्या निवडणुकीत एनडीएमधील भाजप या पक्षाला 74 जागा मिळाल्या आहेत तर जेडीयू पक्षाला फक्त 43 जागा मिळाल्या आहेत.

पाटणा : बिहारमध्ये नव्या सरकारची पायाभरणी झाली आहे. आज पाटणामध्ये एनडीएची बैठक झाली. या बैठकीला भाजप, जेडीयू, हिंदूस्तानी आवाम मोर्चा आणि विकासशील इन्सान पार्टीचे आमदार उपस्थित राहिले होते. या बैठकीत बिहारच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवारावर शिक्कामोर्तब होणार होते. आधीपासूनच नितीश कुमार यांचे नाव मुख्यमंत्री म्हणून चर्चेत होतेच आणि झालेही तसेच. मात्र, नितीश कुमार यांनी म्हटलंय की, ते मुख्यमंत्री बनू इच्छित नव्हते. मात्र, भाजपच्या आग्रहाखातर त्यांनी या पदाचा स्विकार केला आहे. 

हेही वाचा - योगगुरु रामदेव बाबा म्हणतात, मोदींना पुढील 10 ते 20 वर्षे तरी 'नो ऑप्शन'

याआधी नितीश कुमार राजभवनावर पोहोचले आणि त्यांना सरकार बनवण्याचा दावा केला होता. त्यानंतर राज्यपाल यांनी त्यांना सरकार बनवण्याचे निमंत्रण दिले. त्यातच आज भाजप आणि जेडीयूच्या आमदारांची बैठक झाली. ताराकिशोर प्रसाद यांना भाजपचा तर नितीश कुमार यांना जेडीयूच्या आमदारांचा प्रमुख नेता म्हणून निवडलं गेलं. त्यानंतर सगळे आमदार मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या घरी पोहचले. सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह, देवेंद्र फडणवीस आणि भूपेंद्र यादव यांनी देखील सरकार बनवण्यासंबंधीच्या बैठकीत नितीश कुमार यांच्या घरी बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमार यांच्याच नावावर शिक्कामोर्तब झाले.

यानंतर नितीश कुमार यांनी म्हटलं की, मी मुख्यमंत्री बनू इच्छित नव्हतो. माझी इच्छा होती की भाजपमधून कोणीतरी मुख्यमंत्री बनावं. मात्र, भाजपच्या आग्रहाखातर मी मुख्यमंत्री बनत आहे, असं त्यांनी म्हटलं. 

हेही वाचा - आधीच प्रदुषणाने हैराण, तरीही दिल्लीकरांनी फोडले फटाके; राजधानीत स्थिती गंभीर
बिहार विधानसभेच्या निवडणुकीत एनडीएमधील भाजप या पक्षाला 74 जागा मिळाल्या आहेत तर जेडीयू पक्षाला फक्त 43 जागा मिळाल्या आहेत. यामुळे भाजप हा एनडीएमधील मोठा भाऊ ठरला आहे. सहकारी पक्ष हिंदूस्तान आवाम मोर्चा आणि विकासशील इन्सान पार्टीला प्रत्येकी चार जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे असं बोललं जात होतं की भाजप मोठ्या भावाच्या नात्याने मुख्यमंत्री पदावर आपला दावा सांगेल. मात्र, भाजपमधील सर्व मोठ्या नेत्यांनी नितीश कुमार हेच मुख्यमंत्री होतील असं स्पष्टपणे सांगितलं होतं. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nitish kumar says i dont want to become cm but because of bjp insisted me i accepted