esakal | आधीच प्रदुषणाने हैराण, तरीही दिल्लीकरांनी फोडले फटाके; राजधानीत स्थिती गंभीर
sakal

बोलून बातमी शोधा

delhi pollution.

काल दिवाळीनिमित्त दिल्लीकरांनी नियमांना धाब्यावर बसवून फटाके फोडल्याने आज दिल्लीतील एअर क्वॉलिटी इंडेक्स अत्यंत घसरला आहे.

आधीच प्रदुषणाने हैराण, तरीही दिल्लीकरांनी फोडले फटाके; राजधानीत स्थिती गंभीर

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : दिल्ली शहरात हिवाळ्यातील ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यांत वायू प्रदुषणाचा कहर होतो. या काळात तिथली हवा ही श्वासोच्छवासासाठी अत्यंत निकृष्ट दर्जाची बनते. ही समस्या गेल्या काही वर्षांपासून सातत्याने पहायला मिळत असून, त्यावर राजकीय आरोप-प्रत्यारोपांशिवाय काहीच हालचाली होताना दिसत नाहीत. पंजाब-हरियाणा राज्यात शेतकऱ्यांकडून जाळली जाणारी पराली हे या वायू प्रदुषणाचं एक कारण आहे. त्यातच काल दिवाळीनिमित्त दिल्लीकरांनी नियमांना धाब्यावर बसवून फटाके फोडल्याने आज दिल्लीतील एअर क्वॉलिटी इंडेक्स अत्यंत घसरला आहे. पराली जाळण्याचा आणि फटाके फोडण्याचा एकत्रित परिणाम म्हणून राजधानी सध्या अत्यंत निकृष्ट दर्जाच्या हवेमध्ये लोटली गेलीय. 

दिल्ली प्रदुषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील आनंद विहार भागातील एअर क्वॉलिटी इंडेक्स म्हणजेच AQI हा 481 होता. IGI एअरपोर्ट एरियामध्ये तो 457 होता. तर लोधी रोड एरियामध्ये तो 414 होता. रात्री 11 वाजेपर्यंत मिळालेली ही आकडेवारी अत्यंत गंभीर मानली जात आहे. या आकडेवारीनुसार, दिल्ली शहर गंभीर अशा वायू प्रदुषणाला सामोरे जात आहे. दिवाळी समारंभाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये अनेक ठिकाणी लोक सण साजरा करत असताना दिल्लीमध्ये धुक्याचे दाट सावट पहायला मिळाले. 

हेही वाचा - चांगली बातमी! कोरोना लस येण्याआधीच भारतीयांमध्ये प्रतिकारशक्ती

दिल्लीमध्ये फटाकेविक्रीला संपूर्णत: बंदी घातली होती तसेच फटाके उडवण्यावरदेखील संपूर्णत: बंदी होती. तरीही या नियमांचे उल्लंघन करत बहुतांश दिल्लीकरांनी फटाके फोडल्याचं पहायला मिळालं. दिल्लीच नव्हे तर देशातील इतर अनेक राज्यांत फटाक्यांच्या विक्रीवर अथवा त्यांच्या वापरावर बंदी घालण्यात आली होती. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर हा नियम लागू केला गेला होता.

हेही वाचा - कोरोनामुळे होतायत रक्ताच्या गुठळ्या; संशोधनातून समोर आली धक्कादायक माहिती

कोरोना हा श्वसनाचा रोग आहे. फटाक्यांमुळे होणाऱ्या प्रदुषणामुळे कोरोनाच्या प्रादुर्भावात वाढ होण्याची शक्यता वर्तवली गेली होती. दिवाळी सणानंतर देशात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. फटाके बंदीचा नियम अनेक ठिकाणी असूनही काल देशात तो धाब्यावर बसवल्याचं पहायला मिळालं. त्याचे गंभीर परिणाम आता पहायला मिळत आहेत.