योगगुरु रामदेव बाबा म्हणतात, मोदींना पुढील 10 ते 20 वर्षे तरी 'नो ऑप्शन'

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 15 November 2020

रामदेव बाबा अनेकदा राजकीय भूमिका घेताना दिसतात. त्यांचं भाजपशी असलेलं सख्य हे काही लपून राहिलेले नाहीये.

दिल्ली : गगुरु रामदेव बाबा हे येनकेन कारणाने सातत्याने चर्चेत असतात. त्यांचा पंतजली हा ब्रँडदेखील बाजारात चर्चेला असतो. आपल्या वक्तव्याबाबत रामदेव बाबा प्रसिद्ध आहेत. ते अनेकदा राजकीय भूमिका घेताना दिसतात. त्यांचं भाजपशी असलेलं सख्य हे काही लपून राहिलेले नाहीये. अशातच रामदेव बाबांनी असं एक वक्तव्य केलं ज्यावर सध्या चर्चा सुरुय. त्यांनी म्हटलंय की, पुढची 10 ते 20 वर्षे तरी पंतप्रधान मोदींना पर्याय नाहीये. त्यांनी म्हटलंय की, मी मोदींचा भक्त नाहीये पण मी एक राष्ट्रभक्त नक्कीच आहे. तसेच पंतप्रधान मोदी हे देखील एक राष्ट्रभक्त आहेत. त्यामुळे येणारी पुढची 10 ते 20 वर्षे तर मोदींना पर्याय नाहीये. मोदींचं कौतुक तर त्यांनी केलं आहेच. सोबतच त्यांनी काँग्रेसला खोचक सल्लादेखील दिला आहे. त्यांनी राहुल गांधी दिग्विजय सिंह यांना उद्देशून टोला लगावला आहे. त्या दोघांनी मौन योग करावा असा सल्ला रामदेव बाबा यांनी दिला आहे. 

हेही वाचा - बिहारमध्ये एनडीए आमदारांची आज बैठक; मुख्यमंत्रीपदी कोण बसणार?

रामदेव बाबा यांनी ही वक्तव्ये न्यूज 18 इंडिया या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केली आहेत. देशात मोदी फॅक्टर आहे का असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. यावर त्यांनी उत्तर दिलं की, या देशातील कोट्यवधी लोकांचा पंतप्रधान मोदींवर विश्वास आहे. तसेच त्यांच्यामध्ये आणि इतर राजकारणी लोकांमध्ये फरक आहे. मोदींना स्वत:साठी काहीही नकोय हे साऱ्या देशाला ठाऊक आहे. त्यांना जे काही करायचं आहे ते फक्त देशासाठी करायचं आहे. आणि देवाकृपेने त्यांना सगळं काही मिळालं देखील आहे. असं रामदेव बाबा यांनी म्हटलंय. यासोबतच त्यांनी म्हटलं की येत्या दहा-वीस वर्षांत तरी मोदींना काही एक पर्याय नाहीये. 

हेही वाचा - Corona Update : गेल्या 24 तासांत कोरोनाचे 44,684 नवे रुग्ण; 520 लोकांचा देशभरात मृत्यू

यावेळी मुलाखतीत रामदेव बाबांना विचारण्यात आलं की तुम्ही मोदी भक्त आहात, असा आरोप तुमच्यावर केला जातो, याबाबत तुमचं काय म्हणणं आहे? यावर ते म्हणाले की, मोदीभक्त नाहीये तर मी राष्ट्रभक्त आहे. तसेच मी देवाचा, गावाचा, गरीब, मजूर, शेतकरी, दलित, शोषित, वंचित आणि मागासवर्गियांचा भक्त आहे. मी योगी आणि कर्मयोगी आहे. पंतप्रधान मोदी हे स्वत: राष्ट्रभक्त असल्याने मीही त्यांचा सहकारी आहे, असं उत्तर त्यांनी दिलं आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ramdev baba says next 10 to 20 years there is no option for pm modi