अरुंधती रॉय यांचे पुस्तक अभ्यासक्रमातून घेतलं मागे; वादग्रस्त असल्याचा शेरा

सकाळ वृत्तसेवा
Friday, 13 November 2020

ABVP आणि इतर अनेकांनी या पुस्तकाला राष्ट्रविरोधी म्हणत विरोध केला होता. तर विरोधी पक्ष द्रमुक आणि माकपा यांनी या पुस्तकाला काढून टाकण्याचा निषेध केला आहे.

चेन्नई : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेसहित इतर अनेक संघटनांच्या आणि लोकांच्या तक्रारीनंतर तमिळनाडूतील विद्यापीठाने एम. ए. इंग्रजीच्या अभ्यासक्रमातून प्रसिद्ध लेखिका अरुंधती रॉय यांचे पुस्तक 'वॉकींग विद कॉमरेड्स' हे काढून टाकलं आहे. ABVP आणि इतर अनेकांनी या  पुस्तकाला राष्ट्रविरोधी म्हणत विरोध केला होता. विरोधी पक्ष द्रमुक आणि माकपा यांनी या पुस्तकाला काढून टाकण्याचा निषेध केला आहे. रॉय यांनी या पुस्तकात त्यांनी छत्तीसगढच्या माओवाद्यांच्या ठिकाणापर्यंतचा आपला  प्रवास आणि जंगलात त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीचे सविस्तर वर्णन केलं आहे. 

हेही वाचा - तामिळनाडुत कोरोनाचे गांभीर्य पाहून 16 नोव्हेंबरचा निर्णय मागे

मात्र, भाजपचीच विद्यार्थी संघटना असलेल्या ABVP ने या  पुस्तकाला काढून टाकण्याच्या कृतीचं समर्थन केलं आहे. हे पुस्तक तिरुनेलवेलीच्या मनोनमनियम सुंदरनार विद्यापीठाशी संलग्नित कॉलेजमध्ये एम. ए इंग्रजी साहित्यच्या तिसऱ्या सेमिस्टरच्या अभ्यासक्रमात 2017-18 पासून समाविष्ट होते. या विद्यापीठाचे कुलपती के. पिचुमणि यांनी पीटीआयशी बोलताना सांगितलं की, आम्हाला ABVP कडून मागच्या आठवड्यात याबाबत तक्रार मिळाली होती. याशिवाय अनेकांनी याबाबत तक्रार केली होती. तसेच आम्हाला आमच्या सदस्यांकडूनही तक्रार प्राप्त झाली होती. 

हेही वाचा - Fact Check - भारतात 1 डिसेंबरपासून पुन्हा लॉकडाऊन होणार असा व्हायरल मेसेजमध्ये दावा

त्यांनी पुढे म्हटलं की, या तक्रारींमध्ये पुस्तकातील वादग्रस्त लिखाणाचा उल्लेख आहे आणि विद्यार्थ्यांसाठी त्या पुस्तकाला अभ्यासक्रमातून हटवण्याची मागणी केली गेली होती. कुलपती यांनी म्हटलं की या प्रकरणासाठी वरिष्ठ शैक्षणिक तज्ज्ञांच्या नेतृत्वात एक समिती बनवली गेली. यामध्ये अभ्यासक्रम बनवणाऱ्या बोर्डाचे माजी अध्यक्ष आणि सध्याचे अध्यक्ष देखील सामिल होते. त्यांनी म्हटलं की, समितीच्या बुधवारी झालेल्या बैठकीत या पुस्तकाला अभ्यासक्रमातून हटवण्याचा निर्णय घेण्यात आला. याऐवजी पद्म पुरस्काराने सन्मानित एम. कृष्णन यांचे पुस्तक 'माई नेटीव्ह लँड, एसेज ऑन नेचर' याचा समावेश करण्यात आला आहे. विद्यापीठाला वाद नकोयत कारण आम्हाला शिक्षण महत्त्वाचे वाटते. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: arundhati roys book removed from the syllabus university of tamilnadu after abvp protests