संघ पदाधिकाऱ्यांची कुंडली तयार करा; नितीशकुमारांचे आदेश

वृत्तसंस्था
गुरुवार, 18 जुलै 2019

संघ परिवाराशी निगडित असणाऱ्या विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची नावे, पत्ते, दूरध्वनी क्रमांक आणि त्यांचा व्यवसाय आदींशी संबंधित माहिती संकलित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

पाटणा : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी आणि त्यांच्याशी निगडित संघटनांबाबतची माहिती संकलित करण्याचे आदेश देणारे पत्र बिहार पोलिसांच्या विशेष शाखेकडून जारी करण्यात आल्याने खळबळ निर्माण झाली आहे. बिहारमध्ये संयुक्त जनता दल आणि भाजपची आघाडी असतानाही पोलिस खात्याकडून हे पाऊल उचलण्यात आल्याने भाजप नेत्यांमधून आश्‍चर्य व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे गृहमंत्रालयाचे अधिकारीदेखील यावर मोकळेपणाने भाष्य करणे टाळत आहेत. 

हे पत्र 28 मे रोजीच जारी करण्यात आले असून, त्यामध्ये संघ परिवाराशी निगडित असणाऱ्या विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची नावे, पत्ते, दूरध्वनी क्रमांक आणि त्यांचा व्यवसाय आदींशी संबंधित माहिती संकलित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सर्वसाधारणपणे जिल्हा पातळीवरील पदाधिकाऱ्यांबाबतची माहिती गोळा केली जाणार असून, या संदर्भातील अहवाल आठवडाभराच्या आत सादर करण्याचे आदेश गृह विभागाने अधिकाऱ्यांना दिले आहेत. 

नितीशकुमारांकडेच गृह खाते 
बिहारमध्ये गृह खाते हे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याकडेच आहे, त्यामुळे संघाच्या पदाधिकाऱ्यांची माहिती गोळा करण्याचे नितीशकुमार यांनी दिलेले आदेश फार काळजीपूर्वक पाहावे लागतील, असे भाजप नेते सच्चिदानंद राय यांनी म्हटले आहे. या सगळ्या घडामोडींचा दोन्ही पक्षांमधील आघाडीवर कसलाही परिणाम होणार नसल्याचे पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष मिथिलेश तिवारी यांनी नमूद केले.

राज्य सरकारच्या पत्रामध्ये संघ परिवाराशी निगडित 19 संघटनांचा उल्लेख करण्यात आला असून, त्यामध्ये मुस्लिम राष्ट्रीय मंच, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, भारतीय मजदूर संघ, विश्‍व हिंदू परिषद आणि बजरंग दल आदी संघटनांचा समावेश आहे. या संघटनांमधील पदाधिकाऱ्यांची माहिती राज्य सरकार गोळा करणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nitishkumar order to police for collect information about RSS leaders