भारत बंद नाही; तर जनआक्रोश दिवस

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 28 नोव्हेंबर 2016

नवी दिल्ली -  नोटाबंदीच्या निर्णयाविरुद्ध विरोधकांनी उद्या "भारत बंद' पुकारल्याची चर्चा रंगली असताना कॉंग्रेसने या माहितीचे खंडन केले आहे. "उद्या जनआक्रोश दिवस आहे. भारत बंद नाही', असे कॉंग्रेसतर्फे आज स्पष्ट करण्यात आले; तसेच मोदी सरकारचा निर्णय केवळ राजकीय स्वरूपाचा असून, त्याला भ्रष्टाचारविरोधी लढाईचा रंग दिला जात आहे, असाही टोलाही कॉंग्रेसने लगावला आहे.

संसदेत मोदी सरकारविरुद्ध एकत्र आलेल्या सुमारे चौदा विरोधी पक्षांनी गेल्या आठवड्यात संसदेच्या आवारातील गांधी पुतळ्यासमोर जोरदार निदर्शने केली होती; तसेच 28 नोव्हेंबरला देशभरात "जनआक्रोश दिवस' पाळण्याचीही घोषणा केली होती. मात्र "भारत बंद'ची चर्चा सुरू झाल्याने विरोधी पक्षांमध्ये अस्वस्थता आहे. सोशल मीडियामध्ये याबद्दलचे संदेशही व्हायरल झाले आहेत. या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेस प्रवक्ते जयराम रमेश यांनी आज पक्षाची भूमिका स्पष्ट केली. उद्या भारत बंद नसून मोर्चे, निदर्शने याद्वारे जनआक्रोश व्यक्त केला जाणार आहे. विरोधक भारत बंद पाळणार असल्याचा भाजपने अपप्रचार केल्याचा आरोपही जयराम रमेश यांनी केला. नोटाबंदीमुळे आधीच "भारत बंद' झाला असल्याने पुन्हा तो बंद करण्याची गरज नाही, अशीही टिप्पणी त्यांनी केली.

नोटाबंदीच्या निर्णयावर कडाडून टीका करताना जयराम रमेश यांनी, देशातील आर्थिक परिस्थिती पूर्ववत होण्यासाठी 250 दिवसांचा कालावधी लागेल, असा दावा केला. पाचशे रुपयांच्या नोटा बाद झाल्यानंतर तज्ज्ञांच्या मते देशात नव्या पाचशे रुपयांच्या 1200 कोटी नोटांची आवश्‍यकता आहे. आतापर्यंत केवळ 80 कोटी नोटांची छपाई झाली आहे. नोटा छापणाऱ्या चार छापखान्यांची क्षमता दररोज पाच कोटी नोटा एवढी आहे. ती पाहता पुरेशा नोटा छापण्यासाठी 250 दिवस लागतील, असे ते म्हणाले. पंतप्रधान मोदींच्या "कॅशलेस सोसायटी'संदर्भातील विधानाचीही जयराम यांनी खिल्ली उडवली. सव्वाशे कोटी लोकसंख्येच्या देशात केवळ दोन टक्के लोकांकडे प्लॅस्टिक कार्ड असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

Web Title: No Bharat Bandh, Jan akrosh day