जन्माष्टमीच्या सजावटीत चिनी उत्पादने नाहीत - वृंदावन 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 11 ऑगस्ट 2017

"जन्माष्टमीला चिनी बनावटीची उत्पादने वापण्यास संत महंताप्रमाणेत सामान्य माणसांचाही विरोध आहे,'' असे संस्थानचे चिटणीस कपिल शर्मा यांनी सांगितले. सरकारनेही चिनी उत्पादनावर बंदी घालावी, असे आवाहन त्यांनी केले

मथुरा - डोकलामवरुन भारत व चीनमध्ये सध्या तणावाचे वातावरण आहे. याचा परिणाम म्हणजे चिनी उत्पादनांना मागणी घटत आहे. फ्रेंडशिप डे, राखी पौर्णिमेनिमित्त भारतीय बाजार पेठांमध्ये चिनी मालाला फारसा उठाव नसल्याचे दिसून आले. आता जन्माष्टमीच्या सणानिमित्त होणाऱ्या सजावटीत चिनी उत्पादने वापरण्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय वृंदावन येथील श्रीकृष्ण जन्माष्टमी सेवा संस्थानने घेतला आहे.

जन्माष्टमीला संपूर्ण मंदिराची आकर्षक सजावट केली जाते. मात्र यंदा विद्युत रोषणाईसाठी चिनी बनावटीच्या विजेच्या दिव्यांच्या माळा व अन्य सजावटीसाठीचे साहित्य वापरणार नसल्याचे सांगण्यात आले. डोकलाम मुद्यावरुन भारत व चीनमध्ये सध्या सुरू असलेल्या वादाच्या पार्श्‍वभूमीवर हा निर्णय घेतला असल्याचे येथील पुजारी व संस्थानच्या अधिकाऱ्यांनी नुकतेच सांगितले.

"जन्माष्टमीला चिनी बनावटीची उत्पादने वापण्यास संत महंताप्रमाणेत सामान्य माणसांचाही विरोध आहे,'' असे संस्थानचे चिटणीस कपिल शर्मा यांनी सांगितले. सरकारनेही चिनी उत्पादनावर बंदी घालावी, असे आवाहन त्यांनी केले. वृंदावनमध्ये सोमवारी (ता.14) कृष्णजन्माचा सोहळा होणार आहे.

Web Title: No Chinese decoration this Janmashtami in Vrindavan temples