आता चित्रपटगृहांत राष्ट्रगीत म्हणणे बंधनकारक नाही

वृत्तसंस्था
मंगळवार, 14 फेब्रुवारी 2017

चित्रपटगृहांत प्रदर्शित होणाऱ्या चित्रपट वा डॉक्‍युमेंटरीमध्ये राष्ट्रगीताचा अंतर्भाव केला असल्यास; त्यावेळी उभे राहण्याचीही गरज नसल्याचे न्यायालयाने सांगितले आहे

नवी दिल्ली - चित्रपटगृहामध्ये राष्ट्रगीत म्हणणे बंधनकारक नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाकडून आज (मंगळवार) स्पष्ट करण्यात आले. यासंदर्भात सुनाविण्यात आलेल्या याआधीच्या निकालामध्ये दुरुस्ती करत सर्वोच्च न्यायालयाने ही नवी भूमिका स्पष्ट केली आहे. याचबरोबर, चित्रपटगृहांत प्रदर्शित होणाऱ्या चित्रपट वा डॉक्‍युमेंटरीमध्ये राष्ट्रगीताचा अंतर्भाव केला असल्यास; त्यावेळी उभे राहण्याचीही गरज नसल्याचे न्यायालयाने सांगितले आहे.

याआधी गेल्या 30 नोव्हेंबर रोजी, देशभरातील सर्व चित्रपटगृहांमध्ये चित्रपटाआधी राष्ट्रगीत वाजविले गेले पाहिजे आणि नागरिकांना त्या राष्ट्रगीताच्या सन्मानार्थ उभे राहिलेच पाहिजे, असा निकाल न्यायालयाने दिला होता. या पार्श्‍वभूमीवर, न्यायालयाकडून व्यक्त करण्यात आलेली ही नवी भूमिका अत्यंत संवेदनशील मानली जात आहे.

या आधी सुनाविण्यात आलेल्या निकालात राष्ट्रगीत वाजविले जात असताना पडद्यावर राष्ट्रध्वज दाखविण्यात यावा, असे निर्देशही देण्यात आले होते. ""लोकांना हा माझा देश आहे आणि ही माझी मातृभूमी आहे, असे वाटावयास हवे. राष्ट्रगीताच्या या प्रक्रियेमागे राष्ट्रीय ओळख, घटनात्मक देशभक्तीची भावना आहे,'' असे न्यायाधीश दीपक मिश्रा व न्यायाधीश अमिताव रॉय यांच्या खंडपीठाने हा निर्णय सुनाविताना सांगितले होते. मात्र हा निकालात आता न्यायालयाने बदल केल्याचे निष्पन्न झाले आहे.

Web Title: no obligation to sing national anthem in cinema halls